मुंबई : मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्याच्या सुमारे 65 कोटी रुपयांच्या कंत्राट घोटाळ्याप्रकरणी अटक झालेले कथित मध्यस्थ आणि व्हर्गो स्पेशालिटीज प्रा. लि. या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) केतन कदम यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने दुसऱ्यांदा फेटाळला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. जी. शुक्ला यांनी हा निर्णय दिला.
केतन कदम यांना न्यायालयाने या घोटाळ्याचा मास्टरमाइंड मानले आहे. जामीन फेटाळण्याची प्रमुख कारणे नमूद करताना न्यायालयाने म्हटले आहे की, कदम यांचा या गुन्ह्यात थेट सहभाग आहे.त्यांनी बीएमसी अधिकारी आणि कंत्राटदारांशी संगनमत करून निविदांच्या अटी अशा प्रकारे बदलल्या, ज्यामुळे कंत्राटदारांना त्यांच्या फर्मकडून मशीन भाड्याने घेणे भाग पडले आणि त्यांनी कंत्राटदारांकडून मिळालेले पैसे आपल्या शेल कंपन्यांमध्ये वळवले.
कदम हे प्रभावशाली व्यक्ती असल्याने जामीन मिळाल्यास ते पुराव्यांशी छेडछाड करू शकतात आणि साक्षीदारांना धमकावू शकतात, अशी भीती न्यायालयाने व्यक्त केली.आरोपपत्र दाखल झाल्यानंतरही जामीन अर्ज फेटाळताना, कदम यांची भूमिका जामीन मिळालेल्या सहआरोपींपेक्षा अधिक गंभीर असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.