मुंबई (पुढारी वृत्तसेवा):
स्थायी समितीत सर्वपक्षीय सदस्यांनी परस्पर खर्च करण्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केल्यामुळे केईएम हॉस्पिटलमधील परस्पर खर्चाला मोठा लगाम बसला आहे. अलीकडे अवघ्या ९ लाख रुपयांपर्यंतच परस्पर खर्च करण्यात आला असून, याबाबतचा प्रस्ताव माहितीसाठी समितीसमोर सादर करण्यात आला आहे.
मुंबई महापालिका अधिनियम १८८८ च्या ६९ (क) नुसार तातडीच्या कामासाठी ५ ते ७५ लाख रुपयांपर्यंत खर्च करण्याचे अधिकार हॉस्पिटलसह खातेप्रमुखांना आहेत. या मर्यादेपेक्षा अधिक खर्च करावयाचा झाल्यास निविदा प्रक्रिया राबवून तसा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर करणे बंधनकारक आहे.
मात्र, केईएम हॉस्पिटलसह महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये नियमांना बगल देऊन परस्पर करोडो रुपयांचा खर्च केला जात असल्याचा गंभीर आक्षेप स्थायी समितीत घेण्यात आला होता.
केईएम हॉस्पिटल प्रशासनाने ट्रॉफी ठेवण्यासाठी कपाट व अन्य फर्निचर खरेदीसाठी परस्पर खर्च केला होता.
या प्रकरणावरून हॉस्पिटलचे अधिष्ठाता चांगलेच अडचणीत आले होते. त्यांना थेट स्थायी समितीसमोर बोलावण्यात आले असून, "फर्निचर खरेदीचे काम इतके तातडीचे कसे असू शकते?" असा संतप्त सवाल सदस्यांनी केला होता. त्यावेळी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अधिष्ठाता यांनीही यावर मौन बाळगत उत्तर देणे टाळले होते.
सदस्यांच्या या तीव्र नाराजीनंतर अखेर केईएम हॉस्पिटल प्रशासनाने अनियंत्रित खर्चावर नियंत्रण आणले आहे. गेल्या महिनाभरात केवळ ९ लाख रुपयांचा प्रस्ताव परस्पर मंजुरीसाठी आणण्यात आला. यापुढे नियमांचे काटेकोर पालन करूनच तातडीच्या कामांसाठी परस्पर खर्च केला जाईल, अशी स्पष्ट भूमिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली आहे.
अतितातडीच्या कामासाठीच परस्पर खर्च करावा
मुंबई महानगरपालिकेच्या नियमांनुसार केवळ अतितात्डीच्या आणि तातडीच्या कामांसाठीच परस्पर खर्च करावा. मात्र, हा खर्च ५ ते ७५ लाखांच्या मर्यादेत असावा, याकडे सर्व खातेप्रमुखांनी कटाक्षने लक्ष द्यावे. परस्पर करोडो रुपये खर्च करून स्थायी समितीच्या अधिकारांचे हनन करू नका, अशा सक्त सूचना आता प्रशासनाकडून सर्व खातेप्रमुखांना देण्यात आल्या आहेत.