केईएमसाठीही बासमती तांदळाची ई-निविदा pudhari photo
मुंबई

KEM Hospital rice tender : केईएमसाठीही बासमती तांदळाची ई-निविदा

कागदोपत्री काटेकोर अटी, मात्र रुग्णांना दर्जेदार आहार मिळणार का?

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : महापालिकेच्या केईएम रुग्णालयासाठी 7 हजार किलो बासमती तांदुळाच्या पुरवठ्यासाठी ई-कोटेशन प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. मात्र निविदेमध्ये नमूद केलेल्या काटेकोर अटी आणि प्रत्यक्षात रुग्णांपर्यंत पोहोचणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेमध्ये कितपत सुसंगती राहणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नुकतेच सायन रुग्णालयातील रुग्णांसाठी बासमती तांदूळ पुरवठ्याबाबत निविदा काढण्यात आल्या होत्या. मात्र त्या निविदांवर लेखापरीक्षकांनी आक्षेप नोंदवला होता. आता केईएमसाठी निविदा जाहीर झाल्याने पुढे रुग्णांच्या ताटात काय वाढले जाणार, याकडे लक्ष लागले आहे.

पालिकेच्या डायट स्टोअर विभागाने जारी केलेल्या ई-कोटेशननुसार पुरवठा होणारा तांदूळ सीड ॲक्ट 1966 अंतर्गत अधिसूचित बासमती जातींपैकी असणे, नैसर्गिक सुगंधयुक्त, कृत्रिम रंग व पॉलिशिंगपासून मुक्त असणे बंधनकारक आहे. तसेच एफएसएसएआय नियमांनुसार लेबलिंग, प्रयोगशाळा चाचणी व प्रमाणपत्रांची सक्ती करण्यात आली आहे.

मात्र याआधीही सार्वजनिक रुग्णालयांतील आहार पुरवठ्याबाबत दर्जा, साठवण आणि वितरणातील त्रुटींच्या तक्रारी वेळोवेळी समोर आल्या आहेत. त्यामुळे ही काटेकोरता कागदपत्रांपुरती मर्यादित राहणार की प्रत्यक्ष पुरवठ्यावरही कडक पद्धतीने नियंत्रण राहणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

  • विशेष म्हणजे निविदेत तब्बल 30 हून अधिक बासमती जाती मान्य असताना प्रत्यक्षात कोणती जात, कोणत्या दर्जाची आणि कोणत्या दराने रुग्णालयात पोहोचते, याबाबत पारदर्शक माहिती सार्वजनिक पातळीवर उपलब्ध नसते. त्यामुळे नमुना मंजुरी आणि दर्जा तपासणीची प्रक्रिया किती प्रभावी आहे, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT