Borivali National Park Pudhari
मुंबई

Borivali National Park: नॅशनल पार्कमध्ये येणाऱ्या पर्यटकांचे हाल; कान्हेरीसाठी दोन किलोमीटरपर्यंत करावी लागतेय पायपीट

कान्हेरी लेणीच्या मार्गावर बंद पडलेली बस दुरूस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने त्याचा नाहक त्रास हा पर्यटकांना बसत आहे.

पुढारी वृत्तसेवा

प्रकाश साबळे

मुंबई: बोरिवली पुर्वकडील असलेल्या संजय गांधी राष्टीय उद्यान अर्थात नॅशनल पार्कमधील प्रशासनाचा भोंगळ कारभार सुरू आहे. गेल्या आठवड्याभरांपासून वन विभाग प्रशासनाची बंद पडलेल्या बसमधून कान्हेरी लेणीसाठी जाणाऱ्या पर्यटकांना दोन किलो मीटरची पायपीट करावी लागत असल्याचा प्रकार सुरु आहे.

कान्हेरी लेणीच्या मार्गावर बंद पडलेली बस दुरूस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने त्याचा नाहक त्रास हा पर्यटकांना बसत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी पर्यटकांकडून करण्यात आली.

संजय गांधी राष्टीय उद्यान प्रशासनाने बेस्ट परिवहन सेवेची बस बंद केली आहे. यामुळे परिणामी पर्यटकांना पार्कमधील प्रशासनाच्या मालकीच्या असलेल्या बससेवेने कान्हेरी लेणी आणि टायगर सफारी या पर्यटन स्थळी जावे लागत आहे.

प्रशासनाकडे एकूण ६ एलेक्ट्रॉनिक बसेस आहेत. मात्र यापैकी फक्त ३ बससेवा सुरु आहेत. तर २ गॅरेजमध्ये आणि १ कान्हेरी लेणी मार्गावर बंद पडून आहे. अशाप्रकारे कमी बससेवा अभावी पर्यटकांना दररोज नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याचा सर्वाधिक फटका वयोवृद्ध, महिला आणि अपंगाना बसत आहे.

यामुळे कान्हेरी लेणीकडे पर्यटकांनी पाठ फिरविली आहे. परिणामी कान्हेरी लेणी आणि वन विभागाच्या महसूलांवर परिणाम झाला आहे. नॅशनल पार्कच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते कान्हेरी लेणीपर्यंतचे अंतर ८ ते १० किलो मिटर आहे.

बेस्ट बसने सदर ठिकाणी जाण्यासाठी २० रूपये तिकीट घेतले जात होते. तर वन विभाग प्रशासनाच्या बसचे तिकीट १०० रूपये आहे. मात्र तरीसुद्धा पर्यटकांना मध्येच उतरून दोन किलो मीटर चालावे लागत आहे. यामुळे पर्यटकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

बेस्ट बससेवा सुरु करण्याची मागणी

नॅशनल पार्कमध्ये बेस्ट बसची सेवा सुरु होती. मात्र वन विभागाने ती अचानकपणे बंद केल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. तसेच प्रशासनाच्या बसचे तिकीट महागडे असल्याने सामान्य पर्यटकांना ते परवडणारे नसल्याची माहिती पर्यटक रमेश शुक्ला यांनी दिली.

पावसाळ्यामुळे आम्ही बस सेवा कान्हेरी लेणीपर्यत बंद केली आहे. तसेच बेस्ट बस सेवाही न्यायालयाच्या निर्णयानुसार बंद केली आहे. तर बसचे भाडेसुद्धा राज्य सरकारच्या निर्णयानुसार घेण्यात येत आहे.
- किरण पाटील, उपसंचालक नॅशनल पार्क

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT