Kandivali railway station incident Pudhari
मुंबई

Kandivali railway station incident: कांदिवली रेल्वे स्थानकात तिकीट तपासणीवरून गोंधळ; महिला टीसी आणि प्रवाशामध्ये झटापट

विनातिकीट प्रवाशाला रोखण्याच्या प्रयत्नात महिला टीसी फलाटावर पडल्या; प्रकरणी दोघांची चौकशी आणि गुन्हे दाखल

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: पश्चिम रेल्वेच्या कांदिवली स्थानकावर तिकीट चेक करताना एका विनातिकीट महिलेचे टीसीसोबत झालेल्या वादाचे पर्यवसान शुक्रवारी एका मोठ्या गोंधळात झाले. विनातिकीट महिला पळू नये म्हणून रोखण्याच्या प्रयत्नात महिला तिकीट तपासनीस फलाटावर पडल्या आणि या झटापटीत महिला प्रवाशाचे कपडे फाटल्याने स्थानक परिसरात मोठा तणाव निर्माण झाला.

दरम्यान, काही महिलांनी हस्तक्षेप करून विनातिकीट महिलेला रेल्वे आवारातून बाहेर नेल्याचा आरोप पश्चिम रेल्वेने केला आहे. तसेच या प्रकरणात दोघांची चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात आल्याचे बोरिवली रेल्वे पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कानडे यांनी सांगितले.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांदिवली रेल्वे स्थानकात शुक्रवारी संध्याकाळी मुख्य तिकीट निरीक्षक प्रिया अंबावडे प्रवाशांची नियमित तिकीट तपासणी करताना त्यांना २५ वर्षीय एक महिला विनातिकीट आढळली. त्या महिलेने सुरुवातीला दंड न घेता सोडून देण्याची विनंती केली.

मात्र, तिकीट तपासनीस अंबावडे यांनी दंड भरण्यासाठी कार्यवाही सुरू केल्याने विनातिकीट महिलेने स्थानकातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तिचा पाठलाग करताना तपासनीस अंबावडे यांचा तोल गेला आणि त्या प्लॅटफॉर्मवर पडल्या. या बाचाबाचीत विनातिकीट प्रवास करणाऱ्या महिलेचे कपडे फाटले. त्यामुळे मोठा जमाव गोळा होऊन तणाव निर्माण झाला होता.

या घटनेत येथील तीन ते चार अज्ञात महिलांनी हस्तक्षेप करत त्या महिलेला बळजबरीने रेल्वे परिसरा बाहेर नेले. तसेच जमावाने तिकीट निरीक्षकांच्या वर्तनावर आरोप करत त्यांनी सार्वजनिक माफी मागण्याची मागणी केली, असा आरोप पश्चिम रेल्वेकडून शनिवारी करण्यात आला आहे.

दरम्यान, जीआरपी आणि आरपीएफ पोलिसांच्या मदतीने तिकीट तपासनीस आणि विनातिकीट महिला या दोघांना कायदेशीर चौकशीसाठी रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. स्थानक परिसरातील सीसीटीव्ही आणि इतर प्रवाशांकडे चौकशी करून या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT