मुंबई : कांदिवली पूर्वेतील लोखंडवाला ते ठाकूर व्हिलेज 120 फुटी नियोजीत रस्त्यामधील बाधित 47 रहिवाशांना सदनिकांच्या चावी वाटपाचा कार्यक्रम रविवारी (दि.27) आयोजित करण्यात आला होता. मात्र, केंद्रीय मंत्री तथा उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल व्यस्त असल्यामुळे ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. यामुळे चावी स्विकारण्यासाठी आलेल्या रहिवाशांचा हिरमोड झाला असून पालिका आर. दक्षिण विभागाने कार्यक्रमासाठी केलेला खर्चही पाण्यात गेल्याचे दिसून आले. Brihanmumbai Municipal Corporation (BMC)
या संपूर्ण प्रकारामुळे, ‘आम्हाला चाव्या कधी मिळतील, हे एकदाच स्पष्ट करा’, असा संताप रहिवाशांनी व्यक्त केला. मुंबई विकास नियोजन आराखडा (डी.पी.) 2034 मधील नियोजित रस्ता हा महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीतून लोखंडवाला ते सिंग इस्टेट या निवासी विभागातून ठाकूर व्हिलेजकडे जाणारा आहे. या रस्त्यामुळे सुमारे 310 झोपडीधारक बाधित होत आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यातील 47 बाधितांना पालिका आर.दक्षिण विभागाकडून रविवारी ठाकूर व्हिलेज येथील बिटकॉन या पीएपी इमारतीमधील सदनिकांच्या चाव्या वितरीत करण्यात येणार होत्या. याकरिता पालिका आर.दक्षिण प्रशासनाने कार्यालयाच्या आवारात मंडम, खुर्च्या आणि एलसीडी उभारली होती. परंतु केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा वेळ आणि अनुउपस्थितीमुळे पालिका प्रशासनाने सदर कार्यक्रम हा तात्पुरता रद्द करून तो पुढे ढकलला. यामुळे चावी घेण्यासाठी आलेल्या बाधित झोपडीधारकांचा प्रचंड हिरमोड झाला.
उत्तर मुंबईचे खासदार तथा केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या वेळेसाठी लोखंडवाला 120 फुटी रस्त्यातील बाधित झोपडीधारकांना चाव्या वितरणाचा कार्यक्रम हा गेल्या तीन आठवड्यांपासून पुढे ढकलला जात आहे. 27 जुलै रोजी सदर कार्यक्रमाला मुहूर्त मिळाला होता, परंतु संसदेत सध्या सुरु असलेल्या अधिवेशनासाठी मंत्री गोयल यांना दिल्लीला जावे लागत असल्यामुळे त्यांना सदर कार्यक्रमाला उपस्थित राहता येत नसल्याने पालिकेला कार्यक्रम रद्द करून पुढे ढकलावा लागला.
रविवारचा (दि.27) चावी वितरणाचा कार्यक्रम अचानकपणे रद्द केल्याने आता मंत्री पीयूष गोयल यांची तारीख आणि वेळ घेऊन पुढच्या महिन्यात तो पार पाडण्यात येईल, अशी माहिती पालिका आर.दक्षिण विभागातील अधिकार्यांनी दिली.