कांदिवली : कांदिवली पूर्व-पश्चिम जोडणार्या हुतात्मा राजगुरू उड्डाणपुलाच्या पूर्वेकडील मार्गावर अशोक नगर मनपा शाळेचे मैदान म्हणजेच लाल मैदान हे एकमेव खेळाचे मैदान आहे. मात्र सतत विविध कार्यक्रमांसाठी या मैदानाचा वापर केला जात असल्याने खेळाडूंना खेळण्यासाठी मैदान उपलब्धच नसते. त्यामुळे हे मैदान खेळाचे की कार्यक्रमाचे, असा संतप्त सवाल स्थानिक विचारत आहेत.
कांदिवली पूर्वेला अशोक नगर विभागात मनपा अशोक नगर शाळेचे मैदान आहे. या मैदानात स्थानिक ज्येष्ठ नागरिक, महिला फेरफटका मारण्यासाठी येतात. तसेच शाळकरी विद्यार्थी, मुले खेळण्यासाठी येतात. क्रिकेट खेळण्यासाठी मुलांनी दोन क्रिकेट पीचही तयार केले आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी या मैदानात 15 दिवसांचा जैन समाजाचा सत्संग सोहळा पार पडला. त्यानंतर गणेशोत्सवात पालिकेकडून गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव याच मैदानात उभारला होता.
याच मैदानात नवरात्रोत्सवही मोठ्या दिमाखात साजरा झाला. नवरात्रोत्सवापूर्वी मंडप, डेकोरेशनसाठी 10 दिवस, नवरात्रोत्सवाचे 9 दिवस आणि नवरात्रौत्सव संपून आता 7 दिवस उलटूनही येथून मंडप काढण्याचे काम अद्याप सुरुच आहे. यामुळे मैदानात फळ्या, मंडप, बॅनर आणि इतर सामान अस्ताव्यस्त पडलेले आहे. यामुळे स्थानिकांना आणि खेळाडूंना मैदानापासून वंचित राहावे लागत आहे.
मैदानाची दयनीय अवस्था
या मैदानाला दोन प्रवेशद्वार आहेत. प्रवेशद्वाराजवळ दोन सुरक्षा चौकी असून, चौकीच्या मुतार्या झाल्या आहेत. मैदानात चालणे देखील कठीण झाले. एकूणच या मैदानाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. तब्बल दोन महिने मैदानात सतत कार्यक्रम होत असल्याने स्थानिक नागरिकांसह मुलांनी मैदानाकडे पाठ फिरवली आहे.