मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कांदिवली येथील शासकीय तलाव परिसरातील अतिक्रमणांवर प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत साईधाम नगर, भीम नगर आणि आंबेडकर नगर परिसरातील एकूण ३९ झोपड्या निष्कासित करण्यात आल्या असून, तब्बल २५ गुंठे शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात आली आहे. या जमिनीची अंदाजे बाजारभावानुसार किंमत ३५ कोटी रुपये असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
कांदिवली येथील शासकीय तलाव, कांदळवनाचे जतन, संवर्धन आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणात न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना तलाव परिसरातील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश दिले होते.
कांदिवलीतील साईधाम नगरमधील ५२९ आणि बोरिवलीतील ४२६ अशा एकूण ९५५ झोपड्यांचे वनविभाग, नगर भूमापन कार्यालय आणि उपजिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सर्वेक्षण करण्यात आले.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ५० (३) अन्वये सर्व ९५५ अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. यापैकी ९१५ झोपडीधारकांनी २०११ पूर्वीचे पुरावे सादर केले आहेत. त्यामुळे त्यांच्या पात्रतेचा निर्णय घेण्यासाठी ही प्रकरणे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे (एसआरए) पाठविण्यात आली आहेत.
या वेळी महसूल विभाग, मुंबई पोलीस, महापालिका, अग्निशमन दल, वाहतूक पोलीस, नगर भूमापन कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, अदानी इलेक्ट्रिसिटीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.