कांदिवली : कांदिवली पूर्वेकडील दत्त सोसायटीजवळ असलेल्या हाजी मलंग बाबा दर्ग्यावर पालिका आर/दक्षिण विभागाने तोडक कारवाई केली. यामुळे संतप्त झालेल्या मुस्लिम समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. परिणामी, परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
कांदिवलीतील खेल प्राधिकरणाच्या जागेतील काही भागात गेल्या 30 ते 40 वर्षांपूर्वी मुस्लिम समाजाचा हाजी मलंग बाबा दर्गा बांधण्यात आला होता. सध्या समाजातील दानशूर लोकांकडून मदत घेऊन दर्ग्याच्या भिंतीचे बांधकाम सुरू होते सोमवारी सकाळी पालिका आर/दक्षिण विभागाने या दर्ग्याची भिंत आणि छतावर तोडक कारवाई केली. याची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरून मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज या ठिकाणी एकवटला.
पालिकेने कोणतीही नोटीस न देता ही कारवाई केल्याचा आरोप करत मुस्लिम समाजाकडून या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. समता नगर पोलीस चौकीच्या परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. अखेर आंदोलकांनी स्थानिक कार्यकर्ते, पोलीस प्रशासनाच्या मदतीने महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करून दर्ग्याची तोडलेली भिंत आणि छत पुन्हा बांधून देण्याचे आश्वासन घेतल्यावर आंदोलन मागे घेतले.
गेल्या 30 ते 40 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या दर्ग्याची डागडुगी करत असताना कोणतीही नोटीस न देता कारवाई केल्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. अशा पद्धतीने चुकीची कारवाई करून दर्गा तोडणे म्हणजे मुस्लिम समाजावर अन्याय आहे.अजंता यादव, माजी नगरसेविका