Krishna Janmashtami Shopping Pudhari
मुंबई

Krishna Janmashtami Shopping: श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या खरेदीसाठी चारकोप मार्केटमध्ये गर्दी

पाळणे, मुकुट, बासरी, श्रीकृष्णाच्या आकर्षक ड्रेससह विविध साहित्याची रेलचेल

पुढारी वृत्तसेवा

कांदिवली: श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि गोपाळकाल्याच्या पार्श्वभूमीवर कांदिवली-चारकोप मार्केटमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. श्रीकृष्ण जन्मोत्सवासाठी लागणारे पाळणे, मुकुट, बासरी, श्रीकृष्णाचे ड्रेस, फुले, मणी-मोत्यांचे हार, कंठी यांसह विविध सजावटीचे साहित्य बाजारात उपलब्ध असल्याने ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या श्रीकृष्ण जयंतीमुळे बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून व्यावसायिकांच्या गल्ल्यातही वाढ होत आहे.

श्रीकृष्ण जन्मोत्सव बहुतांश नागरिक आपल्या घरातच मोठ्या उत्साहात साजरा करतात. त्यामुळे जन्माष्टमीच्या निमित्ताने घरातील पूजेसाठी तसेच श्रीकृष्णाचा पाळणा सजवण्यासाठी आवश्यक वस्तूंच्या खरेदीला विशेष मागणी आहे.

यंदा बाजारात विविध प्रकारचे आकर्षक पाळणे ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. लहान-मोठ्या आकारातील स्टील व लाकडी पाळणे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. स्टीलचे ४ ते ९ इंच आकाराचे पाळणे १५० ते ४०० रुपयांपर्यंत, तर साधे लाकडी पाळणे ६ ते १२ इंच आकारात २०० ते ७०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. तसेच आकर्षक डिझाइनमधील ६ इंचांपासून दीड फुटापर्यंतचे लाकडी पाळणे ३०० ते २,५०० रुपयांपर्यंत विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.

श्रीकृष्णाच्या सजावटीसाठी विविध प्रकारचे मुकुटही उपलब्ध असून, साधे मुकुट ५० ते १५० रुपये, तर आकर्षक मुकुट ७० ते २५० रुपयांपर्यंत आहेत. तसेच लहान मुलांसाठी विविध आकार व डिझाइनमध्ये श्रीकृष्णाचे ड्रेस ८० ते ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

याशिवाय प्लास्टिकची विविध रंगांची फुले, मणी-मोत्यांचे हार, कंठी तसेच श्रीकृष्णाच्या पाळण्याच्या सजावटीसाठी आवश्यक इतर वस्तूही परवडणाऱ्या दरात बाजारात मिळत आहेत. त्यामुळे आपल्या बजेटनुसार खरेदी करण्यासाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणात पर्याय उपलब्ध झाले आहेत.

चारकोपसारख्या मोठ्या म्हाडा वसाहतीत चाळी,बंगले, इमारती व टॉवरमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी चारकोप मार्केट ही श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या खरेदीची पर्वणीच ठरत आहे. जन्माष्टमी जवळ येत असताना बाजारातील गर्दी आणखी वाढण्याची शक्यता असून, ग्राहकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे व्यावसायिकांमध्येही उत्साहाचे व समाधानाचे वातावरण दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT