Kamathipura Redevelopment Project Pudhari
मुंबई

Kamathipura Redevelopment Project: कामाठीपुरा पुनर्विकास प्रकल्पाला गती; ७ डिसेंबरपर्यंत ५१ टक्के संमतीचे लक्ष्य

कामाठीपुरा पुनर्विकासासाठी म्हाडाचे प्रयत्न वेगात; ७ डिसेंबरपर्यंत ५१ टक्के संमतीचे लक्ष्य असून फेब्रुवारी २०२७ मध्ये बांधकाम सुरू करण्याचे नियोजन.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती मिळाली असून प्रकल्प कार्यालय आणि संमती नोंदणी केंद्राचे उद्‌घाटन खासदार मिलिंद देवरा, अरविंद सावंत, आमदार अमीन पटेल यांच्या हस्ते करण्यात आले.

याचबरोबर प्रकल्पातील रहिवासी, भाडेकरू आणि लाभार्थ्यांना भविष्यात उपलब्ध होणाऱ्या सदनिकांचे स्वरूप प्रत्यक्ष पाहता यावे, यासाठी उभारण्यात आलेल्या नमुना सदनिकेचेही उद्‌घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या सुविधांमुळे प्रकल्पाशी संबंधित नागरिकांना नोंदणी, माहिती आणि पुनर्वसन प्रक्रियेबाबत मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे.

सुमारे ३४ एकर क्षेत्रावर प्रस्तावित असलेल्या कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्पाच्या कक्षेत सुमारे ९४३ उपकरप्राप्त आणि ३४९ बिगर उपकरप्राप्त इमारतींचा समावेश आहे. या प्रकल्पाशी ८,००० हून अधिक रहिवासी व भाडेकरू संबंधित असून, त्यामध्ये सुमारे ६,६२५ निवासी आणि १,३७६ व्यावसायिक भाडेकरूंचा समावेश आहे.

याशिवाय सुमारे ८०० जमीनमालक या प्रकल्पाशी निगडित आहेत. पुनर्विकासाच्या माध्यमातून विद्यमान रहिवासी व भाडेकरूंचे नियोजित पुनर्वसन करण्याबरोबरच सुमारे ४,५०० अतिरिक्त गृहनिर्माण सदनिकांची निर्मिती करण्याचे नियोजन आहे. हा प्रकल्प म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत राबविण्यात येत आहे.

यावेळी 'म्हाडा'चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी लाभार्थी रहिवाशांशी संवाद साधताना सांगितले की, कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्पाला गती देण्यासाठी येथील भाडेकरू/रहिवासी व जमीन मालकांची ५१ टक्के संमती आवश्यक आहे.

येत्या ७ डिसेंबर, २०२६ पर्यंत जास्तीत जास्त भाडेकरू/ रहिवासी व पात्र जमीन मालकांनी या प्रकल्पाला संमती देऊन आपल्या स्वप्नवत हक्काच्या गृहस्वप्नपूर्तीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल टाकावे व सहकार्य करावे. प्रकल्पासाठी भाडेकरू/ रहिवासी व जमीन मालकांची संमती मिळाल्यानंतर प्रकल्पाचा बृहत आराखडा मंजूर करणे, पर्यावरण विभागाच्या परवानग्या मिळवणे, उच्चाधिकार समितीची व नगर विकास विभागाची परवानगी मिळवणे आदी पुढील बाबी तत्काळ केल्या जातील.

७ डिसेंबरपर्यंत ५१ टक्के भाडेकरू, रहिवासी व जमीन मालकांची संमती मिळाल्यानंतर प्रकल्पाला पुढील सर्व परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया जानेवारी- २०२७ अखेरपर्यंत पूर्ण करून फेब्रुवारी - २०२७ मध्ये प्रकल्पाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात केली जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT