पनवेल: कळंबोली जंक्शन सुधारणा प्रकल्प अंतर्गत मुंबईच्या दिशेने होणारी वाहतूक सुरळीत होण्यासाठी एमजीएम हॉस्पीटल समोरील कॉरीडर उपायोगात आणण्यासाठी पनवेल महापालिका व सिडको प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. 5 मे रोजी मोठी तोडक कारवाई करून हा परिसर अतिक्रमणमुक्त करण्यात आला.
या संयुक्तिक कारवाईवेळी पनवेल महानगरपालिका, सिडको प्रशासन, पोलीस प्रशासन यांचे मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ उपस्थित होते. जेसीबीच्या सहाय्याने करण्यात आलेल्या या तोडक कारवाईत एमजीएम रूग्णालयासमोरील वर्षानुवर्षे उभारण्यात आलेली पक्की अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली.
आयुक्त मंगेश चितळे व अतिरिक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईवेळी कारवाई सहायक आयुक्त तथा प्रभाग अधिकारी डॉ. रूपाली माने, अधिक्षक दशरथ भंडारी,उमेश मडवी, सिडको अधिकारी रावसाहेब देवकर व टीम , पोलीस कर्मचारी पनवेल महापालिका अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.