मुंबई : पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या एका विनातिकीट प्रवाशाचे तिकीट तपासनीस यांच्यासोबत झालेल्या वादाचे रूपांतर पुढे मारहाणीत झाल्याची घटना जोगेश्वरी येथे घडली. विनातिकिट ५०० रुपयांच्या दंडावरून सुरू झालेल्या वादात टीसीला मारहाण करण्यात आली. या घटनेत टीसीला डोळ्याखाली गंभीर दुखापत होऊन ७ टाके पडले आहेत. तसेच रेल्वे पोलिसांनी संबंधित प्रवाशाला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
जोगेश्वरी रेल्वे स्थानकात बुधवारी संध्याकाळी पीक अवर्समध्ये ही घटना घडली. तिकीट तपासनीस आशीष रंजन गुप्ता हे जोगेश्वरी स्थानकात तिकीट तपासणी करत असताना त्यांनी आरोपी अजय शिवकुमार धिवर यांच्याकडे तिकीटाची विचारणा केली.
मात्र धिवर यांनी विनातिकिट ५०० रुपयांचा दंड भरण्यावरुन टीसी गुप्ता यांच्याशी वाद घातला. तसेच दंड देण्यास नकार देऊन आरपीएफ कार्यालयात नेण्यास विरोध केला. त्यातून उफाळलेल्या वादात आरोपी धिवर याने टीसीच्या चेहऱ्यावर मारहाण केली. यात धिवर याचा फटका टीसीच्या चष्म्यावर लागल्याने काच फुटून गुप्ता यांच्या डोळ्याखाली गंभीर दुखापत झाली.