Jogeshwari Trauma Hospital Pudhari
मुंबई

Jogeshwari Trauma Hospital: जोगेश्वरी ट्रॉमा रुग्णालय पुन्हा चर्चेत! १५ दिवसांत तीन मृत्यू, उपचारांवर प्रश्नचिन्ह

अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला वेळेत उपचार न मिळाल्याचा कुटुंबीयांचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: जोगेश्वरी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (एचबीटी) ट्रॉमा रुग्णालयात गेल्या १५ दिवसांत तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. यातील नव्या प्रकरणात ५४ वर्षीय फरीद अहमद शेख यांचा मृत्यू झाला.

अपघातात जखमी झाल्यानंतर रुग्णालयात दाखल केलेल्या फरीद यांना वेळेत उपचार मिळाले नाहीत, असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

फरीद हे मूळचे उत्तर प्रदेशातील आझमगडचे रहिवासी असून, व्यवसायाने चालक होते. महाकाली रोडवर झालेल्या रस्ते अपघातात त्यांच्या मांडीचे हाड मोडले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जोगेश्वरी ट्रॉमा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

फरीद यांचे मित्र मुन्ना शेख यांच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांच्या सूचनेनुसार फरीद यांना एका वॉर्डमधून दुसऱ्या वॉर्डमध्ये हलवावे लागले. एक्स-रे काढण्यासाठीही दोनदा धावपळ करावी लागली.

उपचारांच्या प्रतीक्षेत संध्याकाळ झाली आणि त्यानंतर डॉक्टरांनी फरीद यांना मृत घोषित केले. वेळेत उपचार मिळाले असते, तर त्यांचा जीव वाचला असता, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

रुग्णालयाने निष्काळजीपणाचा आरोप फेटाळला

यापूर्वी १० ऑक्टोबर रोजी डेंग्यूने ग्रस्त असलेल्या १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर २१ ऑक्टोबर रोजी सोहेल अख्तर या रुग्णाच्या मृत्यूप्रकरणीही उपचारातील निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला होता.

आता फरीद यांच्या मृत्यूमुळे रुग्णालयातील उपचार व्यवस्थेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र, रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. निरंजन क्षीरसागर यांनी निष्काळजीपणाचा आरोप फेटाळला आहे. फरीद यांच्या मृत्यूमागील नेमके कारण आणि उपचारांमध्ये काही त्रुटी होत्या का, हे संबंधित वैद्यकीय नोंदी व चौकशीतून स्पष्ट होणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT