JJ School of Art Pudhari
मुंबई

JJ School of Art: ‘लोकल टू ग्लोबल’ दिशेने जे. जे. स्कूल ऑफ आर्टची वाटचाल; कला शिक्षणाला जागतिक व्यासपीठ

डी-नोव्हो विद्यापीठ म्हणून नवे अभ्यासक्रम, संशोधन व आंतरराष्ट्रीय सहकार्यावर भर : कुलगुरु प्रा. हीम कुमार चॅटर्जी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाईन या अभिमत स्तरावरील डी-नोव्हो विद्यापीठाने कला शिक्षणाला जागतिक व्यासपीठावर नेण्याची ठोस पावले उचलली आहेत. परंपरेचा मजबूत वारसा जपत अभ्यासक्रम, संशोधन, अध्यापन आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या माध्यमातून ‌‘लोकल टू ग्लोबल‌’ मॉडेल प्रत्यक्षात आणण्याचा विद्यापीठाचा मानस आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. हीम कुमार चॅटर्जी यांनी दिली.

डी-नोव्हो दर्जा मिळाल्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या कक्षेतून बाहेर पडून स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा निर्णय दूरदृष्टीपूर्ण ठरत आहे. कला, आर्किटेक्चर आणि डिझाईन या तीनही क्षेत्रांचे एकत्रित शिक्षण, नवोन्मेष आणि संशोधन भारतात दुर्मिळ असताना, ही क्षमता जे.जे.कडे आधीपासूनच आहे. यासाठी नव्या अभ्यासक्रमांची रचना केली जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

पदभार स्वीकारल्यानंतर संस्थेची कायदेशीर व शैक्षणिक चौकट भक्कम करण्यावर भर दिला. स्वतंत्र परिनियम, अध्यादेश, नियमावली, शैक्षणिक धोरणे, सीएसआर, मनुष्यबळ विकास आणि प्लेसमेंट पॉलिसी कार्यान्वित करण्यात आल्या. त्यामुळे पीएचडीसह संशोधनाधारित अभ्यासक्रमांना कायदेशीर अधिष्ठान मिळाले असून, चालू शैक्षणिक वर्षापासून संशोधन कार्यक्रम औपचारिकपणे सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे, अनेक वर्षे अध्यापन करणाऱ्या पण पीएचडीची संधी न मिळालेल्या शिक्षकांसाठी पीएचडी प्रवेशात 30 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे प्रा. चॅटर्जी यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या दिशेनेही विद्यापीठाने काम सुरु केले आहे. पॅरिससह युरोपमधील विविध कला संस्था आणि विद्यापीठांशी शैक्षणिक देवाणघेवाण, संयुक्त कार्यशाळा, आर्ट कॅम्प्स, संशोधन प्रकल्प तसेच डिजिटल व्याख्याने व प्रदर्शनांबाबत औपचारिक चर्चा सुरू असल्याचेही ते म्हणाले.

डी-नोव्हो दर्जामुळे नव्या अभ्यासक्रमांना मान्यता देण्याचे स्वातंत्र्य जेजेला मिळाले आहे. गेम डिझाईन, डिजिटल आर्ट, ग्राफिक डिझाईन तसेच आर्ट-टीचर ट्रेनिंगसाठी एकात्मिक अभ्यासक्रम विकसित करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

1856 सालचा वारसा लाभलेला जे.जे. कॅम्पस ‌‘लिव्हिंग हेरिटेज‌’ म्हणून विकसित करण्याचा विचार असून, संग्रहालये, शिल्प संग्रह, लायब्ररी, आर्ट टुरिझम आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून हा परिसर शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र म्हणून उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT