जेजे सुपर स्पेशालिटीची रखडपट्टी pudhari photo
मुंबई

JJ Hospital redevelopment : जेजे सुपर स्पेशालिटीची रखडपट्टी

पाचवी डेडलाईन हुकली, ठेकेदाराला आणखी दंड होणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्य सरकारच्या अखत्यारीतील जेजे रुग्णालय परिसरात उभारण्यात येत असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची रखडपट्ठी सुरूच आहे. पाच वेळा मुदतवाढ देवूनही काम फक्त 29 टक्केच पूर्ण झाले आहे.

कामाच्या या दिरंगाईबाबत आतापर्यंत ठेकेदाराला सुमारे 3 कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. पाचवी मुदत चुकल्याने आता आणखी दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याची संकल्पना 2010 मध्ये मांडण्यात आली होती. 2014 मध्ये सर्व प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर 2019 मध्ये भूमिपूजन झाले, तर जुलै 2020 मध्ये प्रत्यक्ष बांधकामाचा वर्क ऑर्डर देण्यात आला. ठेकेदाराला 36 महिन्यांत (2023 पर्यंत) काम पूर्ण करण्याची अट होती. मात्र प्रत्यक्षात आतापर्यंत केवळ सुमारे 29 टक्के कामच पूर्ण झाले आहे.

या प्रकल्पातील कॅथलॅबचे स्थलांतर हा सर्वांत जटिल टप्पा मानला जात आहे. यामध्ये भिंती काढणे, नवीन मार्ग तयार करणे तसेच अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची पुनर्स्थापना करावी लागणार आहे. याशिवाय लिफ्ट बसवणे, एसटीपी (सीवेज ट्रीटमेंट प्लांट), वीज केंद्र आणि विविध तांत्रिक यंत्रणांची उभारणीही अद्याप अपूर्ण आहे. तीन लिफ्टचे साहित्य बांधकामस्थळी पोहोचले असून त्यांची बसवणूक पूर्ण होण्यासाठी सुमारे दीड महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कोरोनाच्या काळातील लॉकडाउनमुळे बांधकाम दीर्घकाळ बंद होते. त्यानंतर पाडकाम व परवनग्या मिळण्यास विलंब झाला.

जेजे सुपर स्पेशालिटी प्रकल्प असा...

  • नियोजित पूर्णता : 2023

  • आतापर्यंतची प्रगती : 29 टक्के

  • एकूण विंग : 4

  • अपूर्ण विंग : 2 (ए आणि बी)

  • आतापर्यंत चुकलेल्या मुदती : 5

  • ठेकेदारावर लावलेला दंड : सुमारे 3 कोटी रुपये

  • हे सुपर स्पेशालिटी रुग्णालय दोन तळमजल्यांसह दहा मजली असणार असून त्यामध्ये 1200 खाटा उपलब्ध होतील.

  • रुग्णालयात सर्व प्रमुख सुपर स्पेशालिटी विभाग, 25 शस्त्रक्रिया कक्ष, कॅथलॅब तसेच व्हीव्हीआयपी वॉर्डची सुविधा असणार आहे.

या सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील सुरुवातीच्या दोन विंग या वर्षअखेर सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अंतिम निर्णय वरिष्ठ स्तरावर चर्चा करून घेतला जाईल.
डॉ. अजय भंडारवार, अधिष्ठाता, जेजे रुग्णालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT