पुढारी ऑनलाईन डेस्क : रिलायन्सच्या जिओचे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे आज (दि.१७) सकाळी सव्वा अकरापासून जिओचे नेटवर्क गेले. त्यामुळे मोबाइल युजर्स आपल्या तक्रारी सोशल मीडियावर मांडताना दिसत आहेत. विशेषत: मुंबईमध्ये जिओच्या सेवांवर कित्येक तास परिणाम झाला. त्याचबरोबर Jio AirFiber सेवांवरही परिणाम झाला. दरम्यान, कंपनीने आउटेज किंवा या घटनेबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
मोबाइल नेटवर्कबाबत माहिती देणाऱ्या डाऊन डिटेक्टर या संकेतस्थळावर सध्या जिओच्या नेटवर्कबाबत किती लोक तक्रारी करत आहेत. याची माहिती देण्यात आली आहे. अवघ्या एका तासात डाउन डिटेक्टरवर 10 हजार हून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. साइटनुसार, 67 टक्के वापरकर्त्यांनी सिग्नल नसल्याची तक्रार केली. तर 20 टक्के लोकांना मोबाइल इंटरनेट समस्या आणि 14 टक्के लोकांना जिओ फायबरमध्ये समस्या असल्याच्या तक्रारी केल्या.
नेटवर्क डाऊनबाबत रिलायन्स जिओकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, एक्सवर Jiodown हा हॅशटॅग ट्रेंड सुरू असून जिओ आणि मुकेश अंबानी यांना ट्रोल करण्यात येत आहे. नेटवर्क समस्यांमुळे सोशल मीडियावर टीका आणि मीम्सची लाट आली आहे. एक्स वर युजर्संनी जिओच्या नेटवर्कमधील व्यत्ययाबद्दल असंतोष व्यक्त केला आहे.