Jayant Patil resignation
मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ करणारी एक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज (दि. १२) आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. या अनपेक्षित घडामोडीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. आता जयंत पाटील महायुतीत जाणार का? अशी चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर एका शब्दात उत्तर दिलं आहे.
जयंत पाटील हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय सहकारी मानले जातात. पक्षाच्या पडत्या काळात आणि फुटीनंतरही त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळली. मात्र, आज अचानक त्यांनी राजीनामा दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. राजीनाम्यामागील नेमकं कारण अद्याप अस्पष्ट नसले तरी, यामागे काही राजकीय समीकरणे असल्याची चर्चा सुरू आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी काही दिवसांपूर्वी त्यांनी केली होती. ही जबाबदारी नव्या तरुण चेहऱ्याकडे द्यावी, अशी विनंती त्यांनी केली होती. पाटील यांच्या राजीनाम्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी शशिकांत शिंदे सांभाळणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नवी मुंबई विमानतळाची पाहणी केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी जयंत पाटील यांच्या राजीनाम्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, "तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, ज्यांनी राजीनामा दिला त्यांना शुभेच्छा आणि जे नवीन होणार आहेत त्यांनाही शुभेच्छा. सर्वांनी चांगलं काम कराव,"असे ते म्हणाले. यानंतर पत्रकारांनी जयंत पाटील महायुतीत येणार आहेत का? अस विचारले असता त्यांनी नाही म्हणून सांगितले.