Hindustani Bhau on Jaya Bachchan
मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार जया बच्चन आपल्या आक्रमक स्वभावामुळे आणि वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असते. अलीकडेच पापाराझींच्या (छायाचित्रकार) कपड्यांवरून त्यांनी केलेल्या टीकेनंतर आता सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि रील स्टार विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊ याने जया बच्चन यांना चांगलेच सुनावले आहे. "जया बच्चन स्वतः १५० रुपयांची साडी नेसतात आणि गरिबांच्या कपड्यांवर भाष्य करतात," अशा शब्दांत त्याने आपला संताप व्यक्त केला.
"जया बच्चन स्वतः गुरुवार बाजारातून १५० रुपयांची साडी खरेदी करून नेसतात, तरीही त्या इतर गरीब लोक कसे गलिच्छ कपडे घालून येतात यावर भाष्य करतात. ज्या ठिकाणी तुम्हाला मानसन्मान मिळत नाही, अशा लोकांच्या मागे जाऊ नका, असे आवाहन हिंदुस्थानी भाऊने केले आहे. त्याच्या मते, जेव्हा सामान्य जनता या सेलिब्रिटींना महत्त्व देणे किंवा त्यांना पाहणे बंद करेल, तेव्हाच त्यांना त्यांची खरी लायकी समजेल. हे सर्व सेलिब्रिटी आज जे काही आहेत ते केवळ जनतेमुळेच आहेत. जर जनतेनेच त्यांचा आदर केला नाही, तर त्यांना कोणीही विचारणार नाही. जिथे आपली किंमत होत नाही अशा लोकांकडे जाणे टाळावे, असे त्याने म्हटले आहे.
वांद्रे येथील बाल गंधर्व रंगमंदिरात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार बरखा दत्त यांच्याशी संवाद साधताना जया बच्चन यांनी पापाराझींवर टीका केली होती. त्या म्हणाल्या, "घाणेरडे पँट घालून आणि हातात मोबाईल घेऊन उंदरांसारखे कुठेही घुसणाऱ्या या लोकांना मी मीडियाचा भाग मानत नाही."