

डान्सर आणि अभिनेत्री नोरा फतेही शनिवारी (20 डिसेंबर) एका भीषण कार अपघातातून थोडक्यात बचावली. एका मद्यधुंद कार चालकाने नोराच्या गाडीला जोरदार धडक दिली. यामध्ये तिच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेनंतर नोरा अजूनही धक्क्यात असून तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला.
नोरा शनिवारी दुपारी मुंबईतील अंधेरी भागात सनबर्न फेस्टिव्हलसाठी जात होती. तिथे ती आंतरराष्ट्रीय डीजे डेव्हिड गुएटासोबत सादरीकरण करणार होती. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास एका मद्यधुंद चालकाने तिच्या कारला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, नोराचे डोकं कारच्या खिडकीवर जोरात आदळले. अपघातानंतर नोराला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, डॉक्टरांनी तिचे सीटी स्कॅन केले. मेंदूला बसलेला सौम्य झटका आणि शरीरावर सूज असल्याने डॉक्टरांनी तिला विश्रांतीचा सल्ला दिला होता, तरीही नोराने तिची व्यावसायिक बांधिलकी पाळत रात्री कॉन्सर्टमध्ये सादरीकरण केले. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत नोरा म्हणाली, ‘हा क्षण अत्यंत भयावह होता, माझ्या डोळ्यासमोरून आयुष्य निघून गेल्यासारखे वाटले’.