Mumbai Protest Pudhari
मुंबई

Mumbai Protest: जंतर-मंतर लाठीमाराविरुध्द मुंबईत मोर्चे; शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंची तिरंगा रॅली

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: दिल्ली येथील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांसह नागरिक मुंबईच्या विविध भागांत रस्त्‍यावर उतरले. मुंबई शहरात शुक्रवारी पांजरापोळ,गोवंडीतील सायन-ट्रॉम्बे, देवनार टिळकनगर, सांताक्रूज आणि शिवाजी पार्क पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विविध ठिकाणी आंदोलने झाली.

दिल्लीतील जंतर-मंतर येथील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे गटाकडून शिवाजी पार्क येथे तिरंगा उंचावूया... राष्ट्रगीत गाऊया... या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आदी यावेळी उपस्थित होते.

"तुमच्याकडे बंदुका आणि लाठ्या असतील, पण आमच्याकडे तिरंगा आहे. भारताच्या राष्ट्रध्वजाला आव्हान देण्याची हिंमत आजपर्यंत कुणी केली नाही," असे ठाम विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका करताना यावेळी केले.

आंदोलनादरम्यान तिरंगा हातात घेऊन सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांवर करण्यात आलेल्या पोलीस कारवाईवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर दडपशाही करणे योग्य नसून, सरकारने विरोधकांचा आवाज दाबण्याऐवजी त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यावे, असे ते म्हणाले.

‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात जोपर्यंत केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी दिला.

या कार्यक्रमाला तरुण-तरुणींची गर्दी जमली होती. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या… असे अनेक फलक त्यांच्या हातात होते. तिरंगा फडकावला जात होता. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो तरुणांच्या हातात होते.

सोनम वांगचुक यांनी आपल्यासाठी २५ दिवस उपोषण केले त्याबद्दल त्यांचे आभार; पण अजून आंदोलन संपलेले नाही. अभिजित दीपके यांच्यासह अनेक तरुण आंदोलन करत आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपला आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे. जे या देशातील तरुण-तरुणींच्या भविष्याशी खेळतात, त्यांचे तुम्ही मित्र बनणार का? असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारले.

तुम्ही सरकारविरोधात उभे राहण्याची हिंमत दाखवली आहे, त्याला मी सलाम करतो. हे आंदोलन आमचे नाही; पण तुमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. मुंबईत तुम्ही मोकळ्या वातावरणात आंदोलन करा, तुमच्या केसालाही कोणी धक्का लावणार नाही, ही हमी मी देतो, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

तुमचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. तरुणाईच्या या आंदोलनाने सरकार बॅकफूटवर आले आहे. त्यामुळे आपला लढा असाच सुरू राहील, असे मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी सांगितले.

केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा,अशी मागणी यावेळी संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी केली.तसेच विद्यार्थ्यांवरील कथित दडपशाही थांबवावी, आंदोलनाचा लोकशाही मार्गाने विचार करावा आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे, अशीही भूमिका विद्यार्थ्यांनी यावेळी मांडली.

टिळकनगर पोलीस ठाण्यात पाच जणांसह इतर आंदोलनकर्त्यांविरुद्ध प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन आणि इतर संबंधित कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई पोलीस दलाचे पोलीस उपायुक्त (ऑपरेशन्स) अकबर पठाण यांनी दिली.

मुंबईत प्रचंड बंदोबस्त

मुंबई पोलिसांनी आंदोलने प्रामुख्याने शांततेत पार पडल्याचे सांगितले असून, परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असल्याचेही स्पष्ट केले आहे. दरम्यान, प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आवश्यक ती कायदेशीर कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक बंदोबस्त तैनात केला होता.नागरिकांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

आंदोलनस्थळी पोलिसाची 'गांधीगिरी'

मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू असतानाही गेल्या पाच दिवसांपासून शिवाजी पार्क परिसरात विद्यार्थी विविध मार्गांनी एकत्र येत आंदोलनात सहभागी होत आहेत. सुरुवातीच्या काही दिवसांत पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई केली. मात्र, त्यानंतरही विद्यार्थ्यांचा उत्साह कमी झालेला दिसला नाही.

"मार बसला, अटक झाली तरी चालेल; पण आंदोलनातून मागे हटायचे नाही," अशी भूमिका अनेक विद्यार्थ्यांनी घेतल्याचे चित्र दिसून आले. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केवळ कायदेशीर कारवाईवर भर न देता संवादाचाही मार्ग स्वीकारला. शिवाजी पार्क परिसरातील बंदोबस्तावर असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना चहा आणि बिस्किटे देऊन शांततेचे आवाहन केले.

आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना समजावून सांगण्याचा हा प्रयत्न अनेकांच्या लक्षात राहिला."घरी आई-वडील तुमची वाट पाहात असतील. कृपया शांततेने घरी जा," असे त्या पोलिसाने विद्यार्थ्यांना सांगितल्याची माहिती आंदोलनात सहभागी असलेल्या एका विद्यार्थ्याने दिली.

महाराष्ट्रात दोन विशेष फास्ट-ट्रॅक न्यायालये

नीट तसेच इतर सार्वजनिक परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील दोन विशेष फास्ट-ट्रॅक न्यायालये नियुक्त केली आहेत. ही न्यायालये औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) आणि नागपूर येथे कार्यरत राहतील, असे अधिसूचनेतून शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले.

केंद्र सरकारने सार्वजनिक परीक्षा (अनुचित साधनांचा प्रतिबंध) कायद्याअंतर्गत अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या विशेष न्यायालयांमध्ये नीट, टीईटी आणि इतर सार्वजनिक परीक्षांशी संबंधित प्रश्नपत्रिका फुटी, गैरप्रकार आणि फसवणुकीची प्रकरणे प्राधान्याने चालवली जाणार आहेत.

या विशेष न्यायालयांमध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ मॉलप्रॅक्टिसेस ॲक्ट, १९८२ अंतर्गत नोंदविण्यात आलेल्या पेपरफुटी, कॉपी, परीक्षा गैरव्यवहार आणि अन्य संबंधित गुन्ह्यांची सुनावणी करण्यात येणार आहे.

या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियेतील पेपरफुटी प्रकरणांचा वेगाने निपटारा होण्यास मदत होईल, तसेच दोषींवर तातडीने कायदेशीर कारवाई होण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT