नवी दिल्ली : प्रशांत वाघाये
जगदीप धनखड यांनी 21 जुलै रोजी उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला. त्यासाठी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि त्यानंतर सोशल मीडियावर यासंबंधी माहिती दिली. अनेकांना यामुळे आश्चर्याचा धक्काही बसला.
कारण 21 जुलैला पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी त्यांनी राज्यसभेचे सभागृह चालवले होते. आपल्या राजीनाम्यात धनखड यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण दिले असले तरी हे एकमेव कारण नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा नक्की का दिला याचे ठोस कारण सापडलेले नाही. प्रकृती अस्वास्थ्य हे त्यांच्या राजीनाम्याच्या अनेक कारणांपैकी एक असू शकते. मात्र, हेच एकमेव कारण आहे, यावर विश्वास बसणार नाही.
जगदीप धनखड राज्यसभा सभापतिपदावर असताना विरोधी पक्षाला सापत्न वागणूक देतात म्हणून काँग्रेससह विरोधी पक्ष त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणू पाहात होते. आता त्याच विरोधी पक्षांना अचानक धनखड यांच्याविषयी कळवळा येत आहे. तर पूर्वी धनखड यांच्याबद्दल भरभरून बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या राजीनाम्यानंतर केवळ काही शब्दांमध्ये त्यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या, हेदेखील बरेच काही बोलून जाते. दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनात धनखड यांनी दिलेला राजीनामा हा चर्चेचा विषय आहे. यामध्ये काही मुद्द्यांवर सरकार आणि राज्यसभा सभापती हे एकत्र येऊ शकत नव्हते. काही मुद्द्यांवर तर दोन बाजू अगदीच टोकाला गेल्याच्या चर्चा संसद परिसरात होत आहेत.
दरम्यान, धनखड यांच्यानंतर उपराष्ट्रपतिपदावर कोण विराजमान होणार, याबद्दल अनेक चर्चांना राजधानीत उधाण आले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील कोणी ज्येष्ठ व्यक्ती, भाजपमधील कोणी वरिष्ठ व्यक्ती किंवा एखाद्या राज्याचे राज्यपाल उपराष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत येऊ शकतात. यामध्ये बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांचे नाव आघाडीवर आहे. त्याला अनेक कंगोरेही आहेत. राज्यसभेचे विद्यमान उपसभापती हरिवंश सिंह आणि कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांचेदेखील नाव चर्चेत आहे. देशातील राजकीय समीकरणे पाहता या दोन नावांवर एनडीए प्रकर्षाने विचार करू शकते.
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक काँग्रेसदेखील सर्व विरोधी पक्षांच्या मदतीने लढवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीमध्ये तेलगू देसम पक्ष आणि नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड पक्ष महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांसोबत एकीकडे भाजपप्रणित एनडीएने संवाद वाढवला आहे,तर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीनेही या दोन्ही पक्षांसोबत संवाद वाढवायला सुरुवात केली आहे. जर तेलगू देसम पक्ष आणि नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड पक्षाने एनडीएच्या सुरात सूर मिसळला नाही, तर मात्र ही निवडणूक चुरशीची होऊ शकते.