मुंबई; पुढारी वृत्तसेवा : जे. जे. समूह रुग्णालयात स्तनदा मातांसाठी शुक्रवारपासून हिरकणी कक्ष सुरु झाला. रुग्णालयाच्या दर्शनी भागांतच ही सेवा रुग्णालयाकडून मोफत दिली जाणार आहे. अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या हस्ते या कक्षाचे उद्घाटन झाले. चाईल्ड हेल्थ फाऊंडेशन आणि अल्केम फाऊंडेशन यांच्या विद्यमाने ही सेवा दिली जात आहे.
बाह्य रुग्ण इमारतीतील तळमजल्यात हा कक्ष सुरु करण्यात आला आहे. एकावेळी किमान चार स्तनदा माता या कक्षाचा लाभ घेऊ शकतात. महिला रुग्णांसह रुग्णालयातील स्तनदा महिला डॉक्टर्स, परिचारिका, महिला कर्मचारी या कक्षाचा लाभ घेऊ शकतात.
अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे म्हणाल्या की, स्तनदा मातांना सुरक्षित वातावरण देणे गरजेचे असते. त्यासाठी रुग्णालयात ही सेवा सुरु करण्यात आली. चाईल्ड हेल्थ फाऊंडेशन आणि अल्केम फाऊंडेशन यांच्या पुढाकाराने अनेक गरजू महिलांना या सेवेचा लाभ घेता येईल.
यावेळी उपअधिष्ठाता डॉ. अमिता जोशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे, बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत माने आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा;