कोपरखैरणे: इरिडियम पार्टिकल विक्रीच्या नावाखाली आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून नवी मुंबईत सुमारे ३०० गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक करणारे तीन ठग नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गजाआड केले आहेत.
या तिघांनी प्रत्येकी ४ ते ५ लाख रुपये घेऊन गुंतवणूकदारांना ठगवले. त्यांच्या फसवणुकीचे हे जाळे अन्य राज्यांमध्येही पसरलेले असावे, असा संशय आहे.
तिर्थंकर तुषार कांती सेनगुप्ता (४८, रा. कोलकाता, पश्चिम बंगाल) आणि जयंत अनंत ओक (५८, रा. सेक्टर १६, कामोठे, नवी मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील अन्य चार कस्टोडियन तसेच त्यांचे बेनिफिशरी आणि एजंट यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
गुंतवणूक करण्यासाठी आरोपीनी स्थापन केलेली कंपनी बोगस असून ‘इरिडियम पार्टिकल योजना’ चालवली. या योजनेत गुंतवणूक केल्यास काही महिन्यांत मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून नागरिकांकडून पैसे स्वीकारले जात होते.
या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून तपास सुरू केला. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी तुर्भे येथील एका हॉटेलमध्ये आरोपी तिर्थंकर सेनगुप्ता याच्याशी बनवट गुंतवणूकदार याची भेट घडवून आणण्यात आली.
यावेळी पाच लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास नोव्हेंबर २०२६ अखेरपर्यंत ९ ते २८ कोटी रुपयांचा परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले. तसेच एक लाख रुपये रोख ॲडव्हान्स म्हणून स्वीकारण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
प्राथमिक तपासात २०१८ पासून सुमारे ३०० गुंतवणूकदारांकडून प्रत्येकी सरासरी चार ते पाच लाख रुपये स्वीकारण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, आजपर्यंत गुंतवणूकदारांना परतावा किंवा मूळ रक्कम परत मिळालेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींकडून दोन मोबाईल फोन आणि एक टॅब जप्त करण्यात आला आहे.