Prabhadevi Temple: प्रभादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाची धूम; ३१० वर्षांची परंपरा आजही कायम

तीनशे वर्षांची श्रद्धापरंपरा; अनेक ज्ञाती समाजांची कुलदेवता
Prabhadevi Temple
Prabhadevi TemplePudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: मुंबईच्या प्रभादेवी परिसराला नाव देणारे श्री प्रभावती देवीचे मंदिर नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने भाविकांच्या गर्दीने गजबजले आहे. ‘नवसाला पावणारी देवी’ अशी श्रद्धा असलेल्या या देवस्थानात दर्शनासाठी, ओटी भरण्यासाठी तसेच नवस फेडण्यासाठी विविध ज्ञाती समाजांतील भाविक सहकुटुंब येत आहेत. सुमारे ३१० वर्षांचा इतिहास लाभलेल्या या मंदिराने मुंबईच्या बदलत्या नागरी जीवनातही आपली धार्मिक परंपरा आणि ऐतिहासिक वारसा जपला आहे.

प्रभादेवी मंदिराचा इतिहास पाठारे प्रभू समाजातील श्याम नायक यांच्याशी जोडला जातो. स्थानिक आख्यायिकेनुसार, श्याम नायक यांना देवीने स्वप्नात दृष्टांत दिल्यानंतर त्यांनी मंदिरासमोरील विहिरीतून देवीची मूर्ती बाहेर काढली.

त्यानंतर १७१५ मध्ये मंदिराची उभारणी करण्यात आली. देवीच्या नावावरूनच या परिसराला प्रभादेवी हे नाव पडल्याचे सांगितले जाते. पुढे परिसराची ओळख विस्तारली आणि १९ जुलै २०१८ रोजी एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकाचे नाव बदलून प्रभादेवी करण्यात आले.

Prabhadevi Temple
Maharashtra FDA Action: महाराष्ट्रात FDA ची मोठी कारवाई! १८.८३ लाखांचा प्रतिबंधित अन्नसाठा जप्त

शक्तीच्या विविध रूपांचे दर्शन

मंदिरातील प्रभावती देवीच्या मूर्तीच्या दोन्ही बाजूंना कालिका आणि चंडिका देवींच्या मूर्ती आहेत. तसेच येथे पाषाणरूपातील कालभैरवाचे स्थान आहे. मंदिर परिसरात शंकर, गणपती-पार्वती, लक्ष्मी-नारायण, हनुमान, शीतलादेवी आणि खोकलादेवी यांची मंदिरे आहेत. त्यामुळे एकाच परिसरात विविध देवतांचे दर्शन घेण्याची संधी भाविकांना मिळते.

मंदिराच्या आग्नेय दिशेला असलेला दीपस्तंभ १८५० मध्ये, तर ईशान्य दिशेला असलेला दीपस्तंभ १९६२ मध्ये बांधण्यात आला. मंदिराच्या परिसराशी आगर बाजाराचा इतिहासही जोडलेला आहे. आज आगर बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात पूर्वी मिठाची आगरे होती. या ठिकाणी तयार झालेले पहिले मीठ देवीला अर्पण करण्याची परंपरा शिलोत्री समाजातील लोकांनी सुरू केल्याचे सांगितले जाते.

Prabhadevi Temple
AI Agents Cybersecurity Threat: AI एजंट्सचा नवा धोका! भारतीय कंपन्यांचा गोपनीय डेटा उघड; CERT-In चा गंभीर इशारा

विश्वस्त संस्थेमार्फत मंदिराचा कारभार

जयानंद कृष्णनाथ कीर्तिकर यांच्याकडे मंदिराचा कारभार आल्यानंतर ‘धी कीर्तिकर फॅमिली प्रभादेवी चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन’ या नावाने विश्वस्त संस्था स्थापन करण्यात आली. या संस्थेमार्फत मंदिराचे व्यवस्थापन केले जाते. सध्या अलर्क लक्ष्मण देसाई आणि अनुराग दीपक तळपदे हे विश्वस्त म्हणून काम पाहतात, तर सुयोग सुनील जोगळेकर हे मंदिराचे मुख्य पुजारी आहेत.

दहा दिवसांचा वार्षिक उत्सव

नवरात्रोत्सवाबरोबरच पौष पौर्णिमेपासून सुरू होणारा देवीचा वार्षिक उत्सव हे मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. पूर्वी तीन दिवस चालणारा हा उत्सव कालांतराने पाच आणि त्यानंतर दहा दिवसांचा झाला. या काळात मंदिरासमोरील अंगणातील वाळूमध्ये मेथी लावण्याची परंपरा जपली जाते. उत्सवाच्या दिवसांत भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलून जातो.

मुंबईच्या इतिहासाशी नाते सांगणारे हे देवस्थान आजही अनेक कुटुंबांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. नवरात्रात देवीचे दर्शन, ओटी भरणे आणि नवस फेडण्यासाठी येणारे भाविक या प्राचीन मंदिराशी असलेले आपले नाते पुन्हा दृढ करतात. आधुनिक मुंबईतही टिकून असलेली ही श्रद्धापरंपरा प्रभादेवी मंदिराचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news