मुंबई : इन्व्हेस्टॉकॲप माध्यमातून शेअर बाजारात दरमहा २ ते ५ टक्के निश्चित परतावा देण्याचे खोटे आमिष दाखवून ३० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची अनियंत्रित ठेव योजनेखाली फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मुख्य आरोपी हिमांशु शर्माला त्याच्या पत्नीसह अटक केली. आरोपींवर भारतीय न्याय संहिता, माहिती तंत्रज्ञान कायदा, विशेषतः 'महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम' (एमपीआयडी कायदा १९९९) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या या कारवाईनंतर नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केले आहे. आरोपीने 'इन्व्हेस्टॉक ' नावाचे एक बनावट आणि अनधिकृत मोबाईल ॲप्लिकेशन तयार केले होते. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली मासिक दोन टक्के ते ५ टक्के निश्चित नफा मिळवून देण्याचा दावा केला गेला.
सुरुवातीला गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांच्या डिजिटल वॉलेटमध्ये नफा दाखवला किंवा किरकोळ रक्कम काढू दिली गेली. मात्र, मोठ्या रकमा जमा झाल्यानंतर ॲप आणि संपर्क बंद करण्यात आले. या प्रकरणात मुंबईत गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता. पोलिसांनी केलेल्या तपासात गोळा केलेले ३० कोटींपेक्षा जास्त रुपये हे वेगवेगळ्या डमी किंवा 'म्युल' बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करून देशाबाहेर किंवा इतर गैरव्यवहारांसाठी वळवण्यात आल्याचे समोर आले आहे.
गुन्हयातील नमुद आरोपी हिमांशु हा नावात बदल करुन विविध ठिकाणी वास्तव्य करीत असल्यामुळे त्याच्या वास्तव्याच्या ठिकाणाची निश्चित माहिती मिळत नव्हती. तसेच गुन्हा दाखल होण्यापुर्वीच आरोपीने आपली ओळख होऊ न देता पलायन करण्याचे ठरविल्याने त्याचा शोध घेणे जिकरीचे झाले होते.
आर्थिक गुन्हे विभाग, मुंबई अंतर्गत कक्ष-५, ज.चि. ३, मुंबई मधील अधिकारी व अमलदार यांनी तांत्रिक तसेच गुप्तबातमीदारामार्फत आरोपीचा कौशल्यपुर्ण सतत शोध घेवुन आरोपी हा डूमास, सुरत, गुजरात येथे असल्याचे निष्पन्न केले. सपोनि श्रीकांत धुमाळ, सपोनि उमेश शिंदे, स.फौ. खाते, स.फौ. देशपांडे व पो.ह. ठाकूर यांच्या पथकाने ही कारवाई केली. या वेळी स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एकुण रु.१ कोटी ६५ करोड रक्कमेचा किंमती ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन
आर्थिक गुन्हे शाखेने या कारवाईनंतर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सेबी किंवा आरबीआयकडे नोंदणीकृत नसलेल्या कोणत्याही अनधिकृत ॲप्स किंवा संस्थांवर विश्वास ठेवू नका. शेअर बाजारात दरमहा निश्चित परतावा देणारी कोणतीही कायदेशीर योजना नसते, त्यामुळे अशा मोठ्या आमिषांना बळी पडू नका. अशा योजनांमध्ये गुंतवणूक करण्यापुर्वी संबंधीत योजनेची विश्वासार्हता, कायदेशीर नोंदणी व आवश्यक आरबीआयच्या परवानग्यांची खात्री करुनच गुंतवणुक करावी. स्वतः सुरक्षित रहावे व आणि इतरांनाही अशा फसव्या योजनापासुन सावध करावे. तसेच नमुद गुन्हयातील पॉन्झी योजनेमध्ये गुंतवणुक करुन ज्यांची आर्थिक फसवणूक झाली असेल.