मुंबईः इन्व्हेस्ट महाराष्ट्र' या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री जयकुमार रावल, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बलगन यांच्यासह सनदी अधिकारी, उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.  (छाया: दीपक सळवी)
मुंबई

Invest Maharashtra : 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र'चा शुभारंभ ८.५ लाख कोटींच्या करारांनी

राज्यभरात तीन लाखांहून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्रातील गुंतवणुकदारांना प्रोत्साहन आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' या उपक्रमाचा गुरूवारी शुभारंभ करण्यात आला. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी ८.५ लाख कोटी रूपयांच्या गुंतवणुकीचे ६७ सामंजस्य करार करण्यात आले. त्यातून तीन लाख रोजगार निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री जयकुमार रावल, मंत्री आशिष शेलार, मंत्री संजय सावकारे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बलगन यांच्यासह सनदी अधिकारी, उद्योग क्षेत्रातील मान्यवर, गुंतवणूकदार, उद्योजक आणि राजनैतिक प्रतिनिधी उपस्थित होते.

'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' च्या शुभारंभासाठी ६७ प्रस्तावित सामंजस्य करारांचे पोर्टफोलिओ तयार करण्यात आले असून, त्यातून ८.५ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक आणि तीन लाखांहून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

या गुंतवणुकीत डेटा सेंटर, सेमीकंडक्टर, अक्षय ऊर्जा, प्रगत उत्पादन, एरोस्पेस, संरक्षण, आरोग्यसेवा आणि कृषीप्रक्रिया यांसारख्या भविष्यातील महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश आहे. प्रस्तावित गुंतवणुकीचा लाभ केवळ मोठ्या उद्योगांपुरता मर्यादित न राहता स्थानिक लघु व मध्यम उद्योग, पुरवठादार, युवक आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्योग क्षेत्राला केले.

मोठ्या उद्योगांनी स्थानिक उद्योगांना आपल्या पुरवठा साखळीत संधी द्यावी, युवकांना आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यासाठी संस्थांसोबत काम करावे आणि स्थानिक उद्योगांच्या विस्ताराला हातभार लावावा, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

मुंबई-३ व मुंबई-४च्या विकासाचा मार्ग

मुंबई-३ आणि मुंबई-४ या शहरांच्या विकासासाठी एमएमआरडीएने सुमारे २१०० चौ. कि. मी. क्षेत्राचे एक्झिस्टिंग (लैंड यूज) काम पूर्ण केले असून, ही प्रक्रिया भारतातील सर्वात जलद पूर्ण झालेली (ईएलयू) प्रक्रिया असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. या कामामुळे दोन्ही शहरांच्या नियोजित विकासाचा पाया भक्कम होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गोंदिया, नाशिक, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालना, पुणे, अहिल्यानगर, रत्नागिरी, पालघर आणि मुंबई महानगर प्रदेश अशा विविध भागांत गुंतवणुकीचे प्रस्ताव असल्याने राज्याच्या सर्व भागांमध्ये विकासाच्या संधी पोहोचविण्याचे शासनाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गुंतवणुकीसोबत जलसंधारणासाठीही उद्योगांनी पुढाकार घ्यावा

कमी पावसामुळे अडचणीत असलेल्या भागातील शेतकरी आणि कुटुंबांच्या समस्यांकडेही उद्योग क्षेत्राने सामाजिक बांधिलकीने पाहावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. उद्योग क्षेत्राने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सढळ योगदान द्यावे, तसेच जलसंधारण, कार्यक्षम सिंचन आणि सांडपाणी पुनर्वापरासाठी संशोधन व अभियांत्रिकी कौशल्याचा उपयोग करावा, असे त्यांनी सांगितले.

त्या चर्चेच्या केंद्रस्थानी महाराष्ट्र

आज जगभरातील कंपन्या आपल्या पुढील कारखान्यांसाठी ठिकाणे निवडत आहेत आणि भविष्यातील तंत्रज्ञान कुठे विकसित करायचे, याचा विचार करत आहेत. या निर्णयांचा आर्थिक संर्धीवर पुढील अनेक दशकांपर्यंत परिणाम होणार आहे. त्यामुळे ज्यावेळी हे निर्णय घेतले जातील, त्यावेळी महाराष्ट्र त्या चर्चेच्या केंद्रस्थानी असला पाहिजे. २०३० पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे आपले ध्येय आहे. अधिकधिक उद्योग, आपल्या नागरिकांचे वाढते उत्पन्न, अधिक सक्षम जिल्हे आणि इथल्या तरुणांना आपले भविष्य महाराष्ट्रातच घडण्याचा मिळणारा आत्मविश्वास. महाराष्ट्रात आणलेली प्रत्येक गुंतवणूक आपल्याला या ध्येयाच्या दिशेने पुढे घेऊन जाणारी असली पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा : उद्योगमंत्री उदय सामंत

इन्व्हेस्ट महाराष्ट्र' कार्यक्रमात आज गुंतवणुकीचे संकल्प करण्यात आले असून, त्यातून महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळणार आहे. राज्यातील उद्योगांना आवश्यक त्या सर्व सुविधा आणि सहकार्य देण्याची जबाबदारी उद्योग विभागाची असून, गुंतवणूकदारांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी विभागातील अधिकारी-कर्मचारी कटिबद्ध आहेत, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. महाराष्ट्राची औद्योगिक ताकद ही देशाच्या औद्योगिक विकासाला चालना देणारी असल्याचे सांगून सामंत म्हणाले की, 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' हा केवळ महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीचा कार्यक्रम नसून, भारताच्या औद्योगिक प्रगतीला दिशा देणारा उपक्रम आहे, असे मंत्री सामंत म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT