Maharashtra Local Body Elections 2025
मुंबई : मृणालिनी नानिवडेकर
देशभर सुरू असलेल्या मतदारयादी फेरतपासणीचे पडसाद महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रक्रियेवर पडणार, हे स्पष्ट झाले आहे. 30 सप्टेंबरपासून 11 शासकीय कागदपत्रे पडताळण्याची ‘एसआयआर’ मोहीम सुरू होणार असल्याने राजकीय पक्षांचे दावे, प्रतिदावे, अतिदावे आता मतदानाला सामोरे जाणार्या राज्यात चर्चेला येणार, हे गृहीत धरले जात आहे.
पूर्वघोषणेनुसार 1 जुलै 2025 रोजी मतदारयादीत नाव असलेले नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान करू शकतील; मात्र देशभर केंद्रीय निवडणूक आयोग राबवणार असलेल्या कागदपत्र पडताळणी मोहिमेनुसार याद्या पडताळणीस तयार राहा, असे राज्य निवडणूक आयोगाने सर्व अधिकार्यांना कळवले आहे.
महाराष्ट्रात मतदारयाद्या ‘एसआयआर’नुसार आहेत काय, याची पडताळणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर सुरू करावी, असे राज्याच्या निवडणूक अधिकार्यांनी कळवले आहे. मात्र, निवडणूक आयोग पारदर्शकतेचे तत्त्व अमलात आणण्यास तयार आहे. खरे मतदार ओळख पटवण्याच्या या शोधमोहिमेला अनुकूल असलेल्या सर्व बाबी महाराष्ट्रात केल्या जाणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी मतदारयादीबाबत कोणतीही हरकत समोर आल्यास उत्तर देण्याची तयारी ठेवण्याचे आदेश सर्व संबंधित अधिकार्यांना दिले आहेत, असे ‘पुढारी’ला सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केलेल्या वेळापत्रकाचे निवडणुकीबाबत पालन केले जाईल, असेही ते म्हणाले.
सध्या महापालिका क्षेत्रात वॉर्ड रचनेवर हरकती नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून, अंतिम मतदारयाद्या किमान 8 ते 10 दिवसांसाठी नागरिकांना आक्षेप नोंदवायचे असल्यास उपलब्ध केल्या जातील. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे मतदारसंघ निश्चित झाले आहेत. नगर परिषदांची प्रभाग रचना 30 सप्टेंबर रोजी, तर काही महापालिकांची प्रभाग रचना 6 ऑक्टोबर रोजी, तर काही ठिकाणची 13 ऑक्टोबर रोजी अंतिम होईल. सध्या या ठिकाणी हरकती व सूचना ऐकण्याची प्रक्रिया सुरू आहे. राज्य शासनाने नेमलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी या सूचना व हरकतींबाबतची सुनावणी ऐकत आहेत. प्रभागांच्या सीमा निश्चित झाल्यावर त्यानुसार मतदारयाद्या विभाजित केल्या जातील. या पाठोपाठ आरक्षण निश्चित होईल.
सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, आयोगाला निवडणूक प्रक्रिया पूर्ण करायची आहे. मतदारयाद्यातील त्रुटींवर घेतले जाणारे आक्षेप हा राष्ट्रीय चर्चेचा विषय ठरला आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती लक्षात घेता आक्षेप घेतले जाणार, हे स्पष्ट आहे. ज्या नावांसंबंधी आक्षेप घेतले जातील ती नावे केंद्रप्रमुखांना कळवून ठेवावीत, स्थलांतराचे किंवा मृत्यूचे दाखले सादर करीत आक्षेप आले तर ते लगेचच निवडणूकप्रमुखांकडे पाठवण्यात येणार आहेत.
मतयंत्रे तयार!
मतदानासाठीची यंत्रे तयार असून, 1 लाख यंत्रांची गरज गृहीत धरण्यात आली आहे. या मतयंत्रांचे नियंत्रण युनिटही तयार आहे. राज्याने यंत्रांची मागणी नोंदवली होती. ती यंत्रे तयार होऊन लवकरच महाराष्ट्राला मिळतील. यापूर्वी राज्य शासनाच्या ताब्यात असलेली यंत्रेही सुस्थितीत असल्याने वापरली जाणार आहेत. कोणतीही अडचण उद्भवल्यास मध्य प्रदेशातील यंत्रेही तयार ठेवली जातील.
...तर यंत्रे तीनदा वापरली जातील!
जिल्हा परिषद, पंचायत समिती; नगरपालिका, नगर परिषदा; महापालिका अशा तीन टप्प्यांत निवडणुका होतील, अशी चर्चा सुरू आहे. त्यासंदर्भात कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही, असे समजते. मात्र, मतयंत्रे तीनदा वापरली जाऊ शकतील. सर्व उमेदवारांसमोर मतयंत्रातील मेमरी मोड्यूल काढून घेतले जाते आणि त्यानंतर त्याच यंत्रात दुसरे मेमरी मोड्यूल टाकून त्याचा उपयोग दुसर्या वर्गवारीतील निवडणुकीसाठी केला जातो. महाराष्ट्रात ती पद्धत राबवली जाण्याची शक्यता आहे.