Instagram Cyber Fraud : इन्स्टाग्रामवरू आपल्या उत्पादनांची जाहिरात करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. अनेक इन्स्टाग्राम युजर फीडमध्ये आलेल्या लिंकवर क्लिक करून आवडचे उत्पादने किंवा सेवा मिळवत असतात. अशीच एक आयसीआयसीआय बँकेच्या कार्डची जाहिरात इन्स्टाग्रावर दिसत होती. एका सेल्समनने ही जाहिरात पाहिल्यानंतर त्याने त्या जाहिरातीच्या लिंकवर क्लिक केलं अन् त्याच्या SBI कार्डवरून तब्बल १ लाख ८० हजार रुपये गायब झाले. पार्कसाईड पोलीस ठाण्यात याबाबतचा फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
तक्रारदार सलीम इब्राहीम पटेल हे आर सिटी मॉलमध्ये सेल्समन आहेत. त्यांनी दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता मोबाईलवर इन्स्टाग्राम पाहत असताना त्यांना ICICI बँकेचे क्रेडिट कार्डची ऑनलाईन जाहिरात दिसली. त्यांना कार्ड हवे असल्याने त्यांनी त्या लिंकवर क्लिक केले.
दुसऱ्या दिवशी, दि. ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता त्यांना कॉल आला. समोरच्या व्यक्तीने "मी ICICI क्रेडिट कार्ड डिपार्टमेंटमधून बोलतोय, तुमची केवायसी करायची आहे" असे सांगितले.
सलीम यांच्या व्हॉट्सअॅपवर ICICI CREDIT http://CARD.apk नावाची फाईल पाठवली आणि लिंक उघडून पॅन कार्ड आणि त्यांच्या SBI क्रेडिट कार्ड ची माहिती भरायला सांगितली. सलीम यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व माहिती भरली. माहिती भरताच काही मिनिटांतच त्यांच्या SBI क्रेडिट कार्डवरून दोन ट्रान्झॅक्शन झाले, एकूण १,८०,००० रु हे पैसे वर वळते झाल्याचा मेसेज आला. हा मेसेज आल्यानंतर सलीम यांना धक्काच बसला. त्यांनी त्वरित पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला असून या क्रमांकाचा तपास सुरू आहे.