मुंबई : वाडिया रुग्णालयात एका नऊ वर्षीय चिमुरडीच्या अवयवदानातून आठ जणांना जीवनदान मिळाले आहे. चिमुरडीच्या किडन्या, यकृत, स्वादुपिंड आणि आतडे दान करण्यात आले आहे. या मुलीला रुग्णालय प्रशासनाकडून मानवंदना देण्यात आली.
या मुलीच्या पालकांचे खरोखरच कौतुक आहे. त्यांनी आपली मुलगी गमावून देखील समाजासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. याचा आम्ही आदर करतो.डॉ. मिनी बोधनवाला, वाडिया हॉस्पिटल.
अलिबाग येथील एका ९ वर्ष १० महिने वयाच्या मुलीला वाडिया रुग्णालयात ३ ऑक्टोबर रोजी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान तिच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा न झाल्याने शनिवारी तिला ब्रेनडेड घोषित करण्यात आले. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. या मुलीच्या दोन्ही किडन्या, यकृत, स्वादुपिंड आणि आतडे दान करण्यात आले. या मुलीची एक किडनी वाडिया रुग्णालयात, दुसरी किडनी अपोलो रुग्णालय आणि यकृत नानावटी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.