मालाड : मालाडच्या मालवणी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि अमानुष घटना उघडकीस आली आहे. म्हाडा वसाहतीमधील एका इमारतीच्या नवव्या मजल्यावरून एका व्यक्तीने मांजरीला खाली फेकून तिची निर्घृण हत्या केल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या घटनेने प्राणी मित्रांमध्ये संतापाची लाट उसळली असून, मालवणी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मालवणी गेट क्रमांक ८ येथील म्हाडा वसाहतीमधील 'ग्रोव्ह मोर' या इमारतीत ५ जून रोजी सायंकाळी ६ वाजून ४८ मिनिटांनी घडली. इमारतीमधील एका रहिवाशाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा संपूर्ण प्रकार कैद झाला आहे. फुटेजमध्ये दिसत असल्याप्रमाणे, नवव्या मजल्यावरील गॅलरीत एक मांजर शांतपणे बसलेली होती. काही वेळात एक व्यक्ती तिथे येते, मांजरीच्या जवळ जाऊन तिच्यावरून मायेने हात फिरवते आणि पुढच्याच क्षणी तिला उचलून खिडकीतून खाली फेकून देते.
या क्रूर कृत्यामुळे मांजरीचा जागीच मृत्यू झाला. इमारतीतच राहणारे मोहम्मद उमेर शमसी यांनी या प्रकरणी १० जून रोजी मालवणी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी घटनेचा संपूर्ण तपशील आणि सीसीटीव्ही फुटेज पुरावा म्हणून पोलिसांना सादर केले आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कासम सय्यद नावाच्या व्यक्तीविरुद्ध मांजरीची हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अनेक प्राणीप्रेमींनी या अमानुष कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. याबाबत बोलताना करिश्मा, ज्या स्वतः सात मांजरींचा मुलांप्रमाणे सांभाळ करतात, त्या म्हणाल्या की, "आपण प्राण्यांशी कसे वागतो, हे आपण ज्या समाजात आहोत त्याचे प्रतिबिंब आहे. हे भयानक कृत्य दाखवते की आपण किती अमानुष बनलो आहोत." मालवणी पोलीस सध्या आरोपी कासम सय्यद याची चौकशी करत असून, पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.