मुंबई

Indrayani River bridge collapse : इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची आर्थिक मदत

सकाळच्या सुमारास अनेक पर्यटक दुचाकींसह पुलावर होते. अचानक मोठा आवाज होऊन पूल कोसळला.

पुढारी वृत्तसेवा

Pune Indrayani River bridge collapse

मुंबई : पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे करण्यात येईल. तसेच जखमींच्या उपचाराचा खर्चसुद्धा राज्य सरकार करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. पूल दुर्घटनेनंतर संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि संबधित तहसीलदार यांच्याशी मी सातत्याने संपर्कात आहे. काहीजण वाहून गेल्याने त्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे.

विभागीय आयुक्त घटनास्थळी रवाना झाले आहेत. घटनास्थळी एनडीआरएफला पाचारण करण्यात आले आहे. मदतकार्याला वेग देण्यात आला आहे. सहाजणांना आतापर्यंत वाचविण्यात यश आले आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे.

घटना कशी घडली?

पुण्यानजीक तळेगाव परिसरातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जुना लोखंडी पूल कोसळून चार पर्यटकांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 15) दुपारी तीनच्या सुमारास घडली. दुर्घटनेत 40 ते 50 जण जखमी झाले असून, अनेकजण अजूनही नदीत बेपत्ता आहेत. यामध्ये काही लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती आहे.

मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. घटनास्थळी एनडीआरएफ पोलिस, अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले आहे. रात्री उशिरापर्यंत मदतकार्य सुरू होते.

पावसाळ्यात कुंडमळा परिसरात धबधबे, निसर्गसौंदर्य आणि पाण्याच्या प्रवाहामुळे हजारो पर्यटक भेट देतात. रविवारीही येथे मोठ्या संख्येने पर्यटक पर्यटनासाठी आले होते. गेल्या काही दिवसांपासून संततधार पावसामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत होती.

शेलारवाडी ते कुंडमळा जोडणारा अंदाजे 50 वर्षे जुना लोखंडी पूल पर्यटकांच्या गर्दीमुळे कोसळला. या पुलाच्या मध्यभागी जुना लोखंडी ढाचा होता; तर दोन्ही बाजू सिमेंटने मजबूत करण्यात आल्या होत्या.

सकाळच्या सुमारास अनेक पर्यटक दुचाकींसह पुलावर होते. अचानक मोठा आवाज होऊन पूल कोसळला आणि पर्यटकांसह त्यांच्या गाड्या थेट नदीत कोसळल्या. काहीजण पुलाच्या ढाच्याखाली अडकले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. जोरदार प्रवाहामुळे अनेक मृतदेह वाहून गेले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT