

maval indrayani river bridge collapse several feared dead kundmala
पुणे : मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवर आजुबाजूच्या गावांना जोडणारा 30 वर्ष जुना लोखंडी पूल रविवारी (दि. 15) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कोसळला. या लोखंडी पुलाच्या ठिकाणी अंदाजे 100 ते 125 पर्यटक वर्षा विहारासाठी आले होते. एकाचवेळी इतका मोठा भार या पुला पेलवला नाही, ज्यामुळे तो कोसळला. या भीषण दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण बेपत्ता आहेत. तर 37 जखमींवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती समोर आली आहे.
रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने कुंडमळा या प्रसिद्ध पर्यटनस्थळी पर्यटकांची मोठी गर्दी होती. दुपारी साडेतीनच्या सुमारास पूल अचानक कोसळला. या वेळी अनेक पर्यटक आणि काही लहान मुले पुलावर उपस्थित होती. पूल कोसळताच अनेकजण थेट नदीत पडले आणि जोरदार प्रवाहात वाहून गेले. या घटनेनंतर घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला. घटनास्थळी पिंपरी-चिंचवड पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक प्रशासन दाखल झाले असून, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, ‘या घटनेत प्राथमिक माहितीनुसार 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत,’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांनी पुधे सांगितले की, ‘6 जणांना आतापर्यंत वाचविण्यात यश आले आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 32 लोक जखमी झाले असून त्यापैकी 6 गंभीर आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.’
सीएम फडणवीस पुढे म्हणाले, ‘स्वतः विभागीय आयुक्त घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. या घटनेसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि संबधित तहसीलदार यांच्याशी मी सातत्याने संपर्कात आहे. काही जण वाहून गेल्याने त्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफला पाचरण करण्यात आले आहे. मदत कार्याला तातडीने वेग देण्यात आला आहे.’
या दुर्घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. रविवार असल्याने पर्यटकांची संख्या जास्त होती, त्यामुळे हानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. काही मोटारसायकलीसुद्धा नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूल कोसळल्यानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. स्थानिक प्रशासन, अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) यांच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या बचावकार्य जोरात सुरू असून, अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.