Indian Railways RAC Ticket pudhari photo
मुंबई

Indian Railways RAC Ticket : रेल्वेकडून 'आरएसी' सुविधा बंदच्या हालचाली

संसदेच्या लोकलेखा समितीच्‍या आक्षेपानंतर विचार सुरू; सामान्य प्रवाशांचा हक्काचा आधार हिरावणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : सणासुदीचे दिवस किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळणे मोठे दिव्य असते. अशा गर्दीच्या काळात तिकीट कन्फर्म झाले नाही, तरी किमान 'आरएसी' तिकीट मिळेल आणि गावी पोहोचता येईल, हीच प्रवाशांची मोठी आशा असते. मात्र, सर्वसामान्य प्रवाशांचा हाच हक्काचा आधार आता हिरावला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय रेल्वे प्रशासनाकडून 'आरएसी' तिकीट सुविधा बंद करण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे.

संसदेच्या लोकलेखा समितीने या व्यवस्थेवर आक्षेप घेतल्यानंतर रेल्वे मंत्रालयाकडून यावर विचार सुरू झाला आहे. तिकीट पूर्ण दराचे आकारून प्रवाशांना अर्धीच जागा दिली जाते. त्यामुळे त्यांना अंशतः परतावा द्यावा किंवा या व्यवस्थेचा आढावा घ्यावा, अशी शिफारस समितीने केली होती. तसेच, नव्याने येणाऱ्या 'वंदे भारत स्लीपर' गाड्यांमध्येही आरएसीची तरतूद ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासन ही सेवा कायमची बंद करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.

त्यामुळे अचानक प्रवासाचे नियोजन करणाऱ्यांसाठी किंवा तातडीच्या कामासाठी प्रवास करणाऱ्यांसाठी आरएसी हा एकमेव पर्याय असतो. जर आरएसी बंद झाले, तर तिकीट बुकिंग करताना थेट 'कन्फर्म' किंवा 'वेटिंग' असे दोनच पर्याय राहतील. अशा वेळी सर्वसामान्यांनी प्रवास करायचा कसा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, सध्या रेल्वे मंत्रालयाकडून या प्रस्तावावर केवळ विचार सुरू असून, कोणताही अधिकृत निर्णय किंवा अधिसूचना जाहीर झालेली नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

  • रेल्वेचा हा संभाव्य निर्णय प्रवाशांसाठी मोठा धक्का ठरू शकतो. सध्या तिकीट वेटिंगवर असेल, तर ई-तिकीटधारकांना ट्रेनमध्ये चढता येत नाही आणि तिकीट आपोआप रद्द होते. अशा वेळी 'आरएसी' तिकीट प्रवाशांना मोठा दिलासा देते. अर्धा बर्थ का होईना, पण प्रवाशांना अधिकृतपणे ट्रेनमध्ये बसून प्रवास करण्याची मुभा मिळते आणि प्रवासादरम्यान कोणाचे तिकीट रद्द झाल्यास बर्थ कन्फर्म होण्याचीही शक्यता असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT