मुंबई: रेल्वे गाड्यांमधील अग्निसुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी रेल्वे बोर्डाने सर्व विभागीय रेल्वे प्रशासनाना महत्त्वाचे निर्देश बुधवारी दिले आहेत. त्यानुसार रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत रेल्वे डब्यांमधील मोबाईल चार्जिंग पॉइंट्स बंद ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे.
दक्षिण पूर्व रेल्वे मार्गावरील एका ट्रेनमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनी ठरलेल्या वेळेत चार्जिंग पॉइंट्स बंद न केल्यामुळे स्फोट होऊन डब्यात धूर पसरला होता. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे.
रेल्वे बोर्डाने सर्व विभागीय रेल्वेच्या 'प्रिन्सिपल चीफ मेकॅनिकल इंजिनिअर्स'ना पाठवलेल्या या पत्रात, रात्रीच्या वेळी रेल्वे डब्यांमध्ये कोणाचेही लक्ष नसताना चार्ज होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळी जेव्हा प्रवासी झोपलेले असतात, तेव्हा या सुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.
त्यासाठी रेल्वे बोर्डाने सर्व विभागीय अधिकारी आणि पर्यवेक्षकांना अचानक पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. या नवीन निर्देशानुसार, सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष होणार नाही याची थेट जबाबदारी रेल्वे कर्मचारी आणि पर्यवेक्षक अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.
रेल्वे डब्यांमध्ये २४ तास चार्जिंग पॉइंट्स उपलब्ध असल्यामुळे प्रवासादरम्यान होणारे विद्युत अपघात आणि संभाव्य आगीचा धोका टाळण्यासाठी या नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे आदेश पत्रात आहे.