Political Leaders Plane Crash Deaths
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या विमानाला बारामती येथे भीषण अपघात झाला असून, या अपघातात अजित पवारांसह एकूण ६ जणांचा मृत्यू झाला आहे. लँडिंगच्या वेळी तांत्रिक बिघाड झाल्याने हे विमान शेतात कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. भारताच्या राजकीय इतिहासात याआधीही अनेक दिग्गज नेत्यांचा अशाच प्रकारे विमान किंवा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे.
संजय गांधी (१९८०): सफदरजंग विमानतळाजवळ स्वतः विमान उडवत असताना २३ जून १९८० रोजी त्यांचे विमान कोसळले. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
माधवराव सिंधिया (२००१): काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री माधवराव सिंधिया यांचे २००१ मध्ये एका रॅलीला संबोधित करण्यासाठी कानपूरला जात असताना त्यांचे खासगी विमान कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.
वाय. एस. राजशेखर रेड्डी (२००९): आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचे हेलिकॉप्टर नल्लामालाच्या घनदाट जंगलात कोसळले होते. २४ तासांच्या मोठ्या शोध मोहिमेनंतर त्यांचे पार्थिव सापडले होते.
जनरल बिपीन रावत (२०२१): लष्करी हेलिकॉप्टर (Mi-17V5) कोसळून झालेल्या भीषण अपघातात जनरल रावत, त्यांच्या पत्नी आणि इतर ११ लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता.
जी.एम.सी. बलैयोगी (२००२) : माजी लोकसभाध्यक्ष आणि तेलुगु देशम पक्षाचे नेते यांचे आंध्र प्रदेश येथे हेलिकॉप्टर अपघातात ३ मार्च २००२ रोजी निधन झाले होते.
सायप्रियन सांगमा (२००४) : मेघालयचे तत्कालीन ग्रामीण विकास मंत्री सायप्रियन सांगमा यांचे हेलिकॉप्टर अपघातात २२ सप्टेंबर २००४ रोजी निधन झाले होते.
ओम प्रकाश जिंदल (२००५) : हरियाणाचे माजी मंत्री ओम प्रकाश जिंदल यांचा २००५ साली हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता.
दोरजे खांडू (२०११) : अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोरजे खांडू यांचे हेलिकॉप्टर अपघातात ३० एप्रिल २०११ रोजी निधन झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईहून विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. बारामतीमध्ये विमानाचे लँडिंग होत असताना वैमानिकाचे नियंत्रण सुटले आणि विमान जवळच असलेल्या एका शेतात कोसळले. अपघात इतका भीषण होता की विमानाने तत्काळ पेट घेतला. घटनास्थळावरून आलेल्या व्हिडिओंमध्ये धुराचे प्रचंड लोट दिसत आहेत. डीजीसीए (DGCA) ने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे.