India IPO Market Pudhari
मुंबई

India IPO Market: देशात आयपीओचा बाजार लक्षणीय वाढतोय

जूनमध्ये १६८ कंपन्यांना सेबीची मान्यता, २.६० लाख कोटी बाजारात येणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: भारताचा आयपीओ बाजार आता संरचनात्मक दृष्टीने अधिक मजबूत टप्प्यात प्रवेश करत आहे. नवीन कंपन्यांची वाढती फळी आणि देशांतर्गत रोखतेत होत असलेली वाढ यामुळे पुढील तीन ते पाच वर्षे प्राथमिक बाजार जाेमाने कार्यक्षम राहील, असे बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

प्राइम डेटाबेसच्या आकडेवारीनुसार, ५ जूनपर्यंत १६८ कंपन्यांना भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्डाकडून (सेबी) त्यांच्या आयपीओसाठी मान्यता मिळाली आहे. या कंपन्या एकत्रितपणे सुमारे २.६० लाख कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहेत. याशिवाय, सुमारे ७० कंपन्या आयपीओच्या माध्यमातून जवळपास १.४१ लाख कोटी रुपये उभारण्यासाठी नियामक मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत.

आयपीओमधील सहभागाची व्याप्ती वाढली असून संस्थात्मक आणि किरकोळ गुंतवणूकदार दोघांनाही यात संधी आणि आव्हाने एकत्र दिसत आहेत, असे गुंतवणूक तज्ज्ञ सुंदर अय्यर यांनी सांगितले. "देशांतर्गत संस्थात्मक भांडवल आता अधिक व्यापक आयपीओंना पाठबळ देऊ शकते, तर किरकोळ सहभागामुळे देशांतर्गत गुंतवणूक प्रवाह सक्रिय होण्याआधीच बाजारात रोखता वाढते, असे ते म्हणाले.

मात्र, सशक्त भांडवली बाजारासाठी सर्व प्रकारच्या गुंतवणूकदार गटांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच, भारताची जागतिक भांडवली बाजारांशी वाढत असलेली परस्परसंबद्धता लक्षात घेता, परदेशी गुंतवणूक संस्थांचा सहभागही आवश्यक आहे, असेही अय्‍यर यांनी सांगितले.

पुरवठ्याच्या बाजूने पाहता, अनुकूल स्थूल-आर्थिक स्थिती आणि क्षेत्रीय अनुकूलतेमुळे सर्वंकष कॉर्पोरेट वाढ होत आहे. परिणामी, अनेक लघु आणि मध्यम आकाराच्या कंपन्या आयपीओसाठी पात्र आकारापर्यंत पोहोचत आहेत, विशेषतः बीएफएसआय, उपभोग्य वस्तू आणि तंत्रज्ञान क्षेत्रांत, जिथे अजूनही मोठी संधी शिल्लक आहे, असे अय्यर यांनी सांगितले.

त्याचवेळी, गेल्या काही वर्षांत झालेल्या मोठ्या प्रायव्हेट इक्विटी आणि व्हेंचर कॅपिटल गुंतवणुकीचे रूपांतर आता एक्झिटआधारित आयपीओंच्या स्पष्ट दिसणाऱ्या फळीत होत आहे, असे ते म्हणाले. मागणीतही संरचनात्मक वाढ होत आहे. वाढत्या एसआयपी प्रवाहामुळे आणि घरगुती बचतीच्या वाढत्या आर्थिकीकरणामुळे देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांची संख्या वाढत आहे.

पेन्शन फंड आणि कॉर्पोरेट ट्रेझरींचा सहभाग तुलनेने कमी असल्याने यात अजूनही मोठी संधी आहे. महत्त्वाचे म्हणजे, परदेशी गुंतवणूकदारांच्या तुलनेत देशांतर्गत गुंतवणूकदार वाटप आकारांबाबत (अलोकेशन साइज) अधिक लवचिक असतात, ज्यामुळे स्पर्धात्मक आयपीओंमध्येही व्यापक सहभाग शक्य होतो, असे अय्यर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT