मुंबई : टेकफेस्टमध्ये मनमोकळ्या गप्पा मारताना भारतीय हवाई दलाचे पायलट आणि अंतराळयात्री शुभांशू शुक्ला, प्रशांत नायर आणि अंगद प्रताप. pudhari photo
मुंबई

Human spaceflight : मानव अंतराळ मोहिमेकडे भारताचे निर्णायक पाऊल

आयआयटी मुंबईच्या टेकफेस्टमध्ये इस्रोचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायण, शुभांशू शुक्ला, प्रशांत नायर, अंगद प्रताप यांचा संवाद

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : उपग्रह, स्वदेशी प्रक्षेपण वाहने आणि महत्त्वाकांक्षी वैज्ञानिक मोहिमांच्या जोरावर भारताने जागतिक व्यासपीठावर आपली ओळख अधिक ठळक केली असून, आता मानव अंतराळ मोहिमेकडे निर्णायक पाऊल टाकले जात आहे. 2035 पर्यंत देशाचे स्वतःचे अंतराळ स्थानक उभारणे आणि 2040 पर्यंत भारतीय अंतराळवीरांना चंद्रावर उतरवणे, हे स्पष्ट लक्ष्य असल्याची माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)चे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायण यांनी आयआयटी मुंबईच्या टेकफेस्ट कार्यक्रमात दिली.

अखेरच्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात गगनयान मोहीमेसाठी निवड झालेले भारतीय हवाई दलाचे पायलट आणि अंतराळयात्री शुभांशू शुक्ला, प्रशांत नायर आणि अंगद प्रताप यांनी मोहिमेची तयारी, प्रशिक्षणातील जबाबदाऱ्या आणि निवड प्रक्रियेतील कठोर निकष याबाबत विद्यार्थी व उपस्थितांशी संवाद साधला.

आज पीएसएलव्ही, जीएसएलव्ही, एलव्हीएम-3 आणि एसएसएलव्ही ही स्वदेशी प्रक्षेपण वाहने विविध कक्षांमध्ये उपग्रह प्रक्षेपित करण्यास सक्षम झाली आहेत. चांद्रयान-1 मोहिमेतून चंद्रावर पाण्याच्या अणूंचा शोध लागला, तर चांद्रयान- 2 मधील ऑर्बिटर आजही मौल्यवान माहिती पाठवत आहे. चांद्रयान -3 ने 23 ऑगस्ट 2023 रोजी दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वी सॉफ्ट लँडिंग करत इतिहास रचल्याची आठवण डॉ. व्ही. नारायण यांनी यावेळी करून दिली.

2047 पर्यंत ‌‘विकसित भारत‌’चे ध्येय साध्य करताना अंतराळ क्षेत्राची भूमिका अधिक व्यापक ठरणार आहे. उपग्रह तंत्रज्ञानामुळे अन्न व जलसुरक्षा, वनसंवर्धन, दूरसंचार, दूरचित्रवाणी, टेलिमेडिसिन, आपत्ती व्यवस्थापन आणि मत्स्य व्यवसायात थेट लाभ होत आहे. संभाव्य मासेमारी क्षेत्राची माहिती दररोज लाखो मच्छीमारांपर्यंत पोहोचवली जात असून, यामुळे उत्पन्नवाढीसह राष्ट्रीय अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रशांत नायर यांनी सांगितले की, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) गगनयान मोहिमेमुळे भारत अंतराळ इतिहासात महत्त्वाचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर आहे. भारतीय रॉकेट, भारतीय कॅप्सूल आणि भारतीय अंतराळतळाच्या माध्यमातून भारतीय अंतराळवीराला पृथ्वीच्या निम्न कक्षेत पाठवून सुरक्षितपणे परत आणणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर भारत सोव्हिएत संघ, अमेरिका व चीननंतर मानवी अंतराळ मोहीम राबवणारा जगातील चौथा देश ठरणार आहे.

गगनयान मोहिमेपूर्वी काही मानवरहित चाचणी उड्डाणे करण्यात येणार असून, त्यानंतर 2027 मध्ये मानवी उड्डाणाची योजना आहे. ही मोहीम केवळ भारतासाठी नव्हे, तर जागतिक पातळीवर, विशेषतः विकसनशील देशांसाठी महत्त्वाची असल्याचे शुभांशू शुक्ला यांनी नमूद केले.

सध्या आपण विकास टप्प्यात आहोत, त्यामुळे विकास प्रक्रियेतही आम्हाला वेगवेगळ्या भूमिका दिल्या आहेत. कोणी ह्युमनमशीन इंटरफेस पाहतोय, कोणी प्रक्रियांची गुणवत्ता तपासतोय, तर कोणी ह्युमन सिस्टम इंटिग्रेशन पाहतोय. गगनयान मोहीमेसाठी राबविण्यात आलेल्या निवड प्रक्रियेत 200 जणांमधून पाच जणांची निवड झाली असल्याचे सांगत अंगद प्रताप यांनी निवड करताना अनेक कठोर नियम, चाचण्या घेतल्याचे स्पष्ट केले. तसेच अंतराळवीर निवड प्रक्रिया अत्यंत कठीण व दीर्घकाळ चालणारी असते. वैद्यकीय, शारीरिक, मानसिक तंदुरुस्ती या तिन्ही बाबी निर्णायक ठरतात. विशेषतः मानसिक लवचिकता सर्वात महत्त्वाची असते, असे अंगद प्रताप यांनी सांगितले.

आजही भारत ‌‘सारे जहाँ से अच्छा‌’

‌‘अंतराळातून भारत कसा दिसतो‌’ या प्रश्नावर उत्तर देताना गगनयात्री शूभांशु शुक्ला हा प्रश्न आजवर इतक्या वेळा विचारण्यात आला आहे, की त्याचा विक्रमच होईल. हा प्रश्न विंग कमांडर राकेश शर्मा यांना विचारण्यात आला होता आणि त्यांचे उत्तर ऐतिहासिक ठरले. त्या उत्तरापेक्षा चांगले उत्तर मी देऊ शकत नाही. मात्र 1984 मधील भारत आणि आजचा भारत यामध्ये मोठा बदल झाला आहे. आजचा भारत अंतराळातून पाहिला असता आत्मविश्वासपूर्ण, धाडसी आणि सक्षम दिसतो. त्यामुळे आजही भारत ‌‘सारे जहाँ से अच्छा‌’ असल्याची भावना अधिक दृढ झाल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT