ठळक मुद्दे
राष्ट्रीयस्तरावर पाच पक्ष, राज्यस्तरीय पाच पक्ष
इतर प्रादेशिक नऊ पक्ष
एकूण १९ चिन्हे राखीव
मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया २३ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांसाठी तब्बल १९४ चिन्हे उपलब्ध करून दिली आहेत. यात खाद्यपदार्थांसह विविध प्रकारच्या चिन्हांचा समावेश आहे. अपक्ष उमेदवारांना सफरचंद, बिस्कीट, पाव, केक, ढोबळी मिरची, फूल कोबी, नारळ, ऊस, आले, द्राक्ष, हिरवी मिरची, फणस, भेंडी, मका,भुईमूग, वाटाणे, पेर, अननस, कलिंगड, आक्रोड आणि जेवणाची थाळी यांसारखी चिन्हे निवडता येतील. वाहन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चिन्हेही मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत.
निवडणूक लढवणाऱ्या अपक्ष उमेदवारांना तसेच अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांना या मुक्त चिन्हांमधून निवड करता येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यता प्राप्त नसलेल्या, पण नोंदणीकृत अशा ४१६ पक्षांनी नोंदणी केली आहे. त्यांना मान्यताप्राप्त पक्ष श्रेणीतील राखीव चिन्हे न देता स्वतंत्र चिन्हे दिली जाणार आहेत. मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना त्यांच्या राखीव चिन्हांवरच उमेदवार उभे करण्याची मुभा राहील. राष्ट्रीय स्तरावरील पाच पक्ष, राज्यस्तरीय पाच पक्ष आणि इतर राज्यातील राज्यस्तरीय नऊ पक्षांची चिन्हे राखीव ठेवण्यात आली आहेत.
मतदारांना उमेदवाराचे नाव लक्षात ठेवणे नेहमीच सोपे नसते. परंतु निवडणूक चिन्ह सहज लक्षात राहते. यामुळे मतदारांना चिन्हावरून उमेदवाराला मतदान करणे सोपे जाते. अपक्ष उमेदवारांना अर्ज भरताना तीन मुक्त चिन्हे नमूद करणे बंधनकारक आहे. येत्या २ जानेवारी २०२६ रोजी अर्ज माघारीनंतर आणि त्यानंतर होणाऱ्या निवडणूक चिन्हांच्या वाटपाने ३ जानेवारी रोजी अंतिम चित्र स्पष्ट होईल.
... असे होते चिन्हवाटप
चिन्हवाटपासाठी विशिष्ट क्रम पाळला जातो. आघाड्या किंवा फ्रंट यांना मुक्त चिन्हांपैकी अग्रक्रमाने मागणी केलेली चिन्हे देण्यासाठी विचार केला जातो. मात्र असे चिन्ह एकापेक्षा जास्त आघाडी/संघटना/फ्रंट यांनी प्रथम अग्रक्रमाने मागितल्यास चिठ्या टाकून निर्णय घेतला जातो. अपक्षांच्या वरती त्यांना प्राधान्य मिळू शकते. मुक्त चिन्हांपैकी वाटप झाल्यानंतर उर्वरित चिन्हे अपक्ष उमेदवारांना त्यांनी दिलेल्या अग्रक्रमाचा विचार करून दिली जातात.