अंबरनाथ ( मुंबई ) : महाराष्ट्रात भाऊ बंधकीचे नाटक गाजले होते. आता मनोमिलनाच्या नाटकाचा प्रयोग रंगणार आहे. अशी टीका शिवसेनेचे मुख्य नेते व उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंवर केली. अंबरनाथच्या धर्मवीर आनंद दिघे नाट्य मंदिराचे लोकार्पण एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी (दि.19) करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
अंबरनाथ शहराच्या पश्चिमेला रेल्वे स्थानकापासून काही अंतरावरच धर्मवीर आनंद दिघे नाट्य मंदिराचे लोकार्पण एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व पद्मश्री अशोक सराफ यांच्या उपस्थितीत करण्यात आले. तर येथील रंगमंचाला ज्येष्ठ नाटककार बाळ कोल्हटकर यांचे नाव देण्यात आले. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा देखील नाट्यमंदिराच्या प्रांगणात बसवण्यात येणार आहे. यावेळी पुढे शिंदे म्हणाले, एका कार्यक्रमात इतकी मोठी मान्यवर मंडळी येतात हे आयोजकांचे यश आहे. पद वर खाली होत राहतात पण नाव टिकवण्याचे काम आपण केले पाहिजे, असे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. त्यांनी मला दिलेले लाडके भाऊ हे नाव मला आवडीचे आहे.
शेतकरी संकटात कलावंत मदतीला आहेत. आम्ही बांधावर गेलो तेव्हा त्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही हा शब्द दिला तो पाळण्याचे काम केले. शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीचे पैसे जाऊ लागले. बळीराजाच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचे काम सर्वांनीच केले आहे. असे ही शिंदे म्हणाले. याप्रसंगी पद्मश्री अशोक सराफ, महेश कोठारे, उषा नाडकर्णी, अलका कुबल, मकरंद अनासपुरे, विजय पाटकर, विजय गोखले, सिद्धार्थ जाधव, विशाखा सुभेदार, संतोष जुवेकर, अशोक पत्की, अशोक समेळ, मंगेश देसाई, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, डॉ. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष, अरविंद वाळेकर, सुनील चौधरी, कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड, माजी मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, यांच्यासह नाट्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर अशोक सराफ यांनी तर अशोक सराफ यांनी अंबरनाथच प्राचीन शिवमंदिर शहराची शान आहे. दुसरं शिवमंदिर हे नाट्यमंदिर आहे. त्याला जपा असे ते आपल्या भाषणात म्हणाले.