छगन भुजबळ,www.pudhari.news 
मुंबई

अन्नधान्य, शालेय साहित्य, हॉस्पिटल बिलावर जीएसटी लावू नका : छगन भुजबळ

अमृता चौगुले

मुंबई, पुढारी वृत्‍तसेवा : जीएसटी परिषदेने सुचविलेल्या दरवाढीला देशभरात विरोध होत आहे. ही तांत्रिक दरवाढ आहे असे सरकारकडून सांगितले जात असले, तरी आताच ती करणे टाळता आले असते आणि राज्यातील आणि देशातील जनतेला या महागाईला तोंड द्यायची वेळ आली नसती. छोट्या छोट्या गोष्टींवर जीएसटी लावणे हे अन्यायकारक असून किमान अन्नधान्य, शालेय साहित्य व हॉस्पिटल बिलावरील तरी जीएसटी लावण्यात येऊ नये असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ म्‍हणाले.

महाराष्ट्र वस्तू व सेवाकर सुधारणा विधेयक – २०२२ वर बोलताना छगन भुजबळ यांनी काळी दाढी आणि पांढरी दाढी यावर मिश्किल टिप्पणीही विधानसभेत केली. कोरोना काळातील कमी झालेले करसंकलन गेल्या काही महिन्यात पुन्हा वाढले आहे. मात्र कोरोना काळातून सावरलेल्या जनतेला पुन्हा जीएसटीने मारले असे म्हणावे लागेल. कारण यामुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढेल. अन्नधान्य, शालेय वस्तू, हॉस्पिटल बिल यावर जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्वाधिक फटका हा सर्वसामान्य नागरिकांना बसणार असून त्याचे परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होणार आहेत, असे भुजबळ यांनी सांगितले.

केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंसह खाद्या पदार्थांवर कर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयापुर्वी अन्नधान्यासह काही जीवनावश्यक वस्तु आतापर्यंत करमुक्त होत्या. त्यावर व्हॅटही आकारण्यात येत नव्हता. पण जीएसटी परिषदेच्या नव्या निर्णयामुळे पॅकिंग अन्नधान्य, पीठ, रवा, मैदा आणि दुग्धजन्य पदार्थांवर ५ टक्के जीएसटी लागू होणार आहे. पण या जीएसटी दरवाढीचा फटका उत्पादक, शेतकरी, वितरक व्यापारी आणि ग्राहकांनाही बसणार आहे. दही, पनीर, कोरडे सोयाबीन, लस्सी, मध, मटार, गहू, तृणधान्ये आणि तांदूळ यासारख्या उत्पादनांना अगोदर कोणताही टॅक्स नव्हता. पण आता या उत्पादनांवर ५ टक्के जीएसटी आहे. यासोबतच बँकेकडून चेक जारी करण्यासाठीही १८ टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. नकाशे आणि तक्त्यांवर १२ टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय म्हणजे जनतेला महागाईच्या खाईत लोटण्याचा प्रकार होत आहे.

तसेच, शिक्षणाशी संबंधित गोष्टीही आता महागणार आहेत. कोणत्याही देशात शालेय गोष्टींवर टॅक्स नसेल मात्र आता तो भारतात आहे. हा दुर्दैवी प्रकार आहे. काही वर्षांपूर्वी सरकारने एक जाहिरात काढली होती "स्कूल चले हम". मात्र आता जीएसटी नंतर म्हणावे लागेल स्कूल चले हम – जीएसटी के साथ असा टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला.

भारतात आर्थिक मंदी येणार नाही असे देशाच्या अर्थमंत्री म्हणत आहे. मात्र भाजप नेते आणि माजी राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मंदीबद्दल अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी जे वक्तव्य केले त्याबद्दल एक ट्वीट केले होते त्यात भारतात आर्थिक मंदी येण्याचा प्रश्नच नाही. अर्थमंत्री बरोबर बोलत आहेत. कारण भारतीय अर्थव्यवस्था गेल्या वर्षीच मंदीच्या गर्तेत सापडली आहे. सर्व गोष्टींवर आज जीएसटी आहे फक्त भाषणावर जीएसटी नाही असा टोलाही भुजबळांनी लगावला आहे.

भाषण करून, काळे धन परत आणण्याच्या घोषणा करत नोटबंदीसारखे निर्णय घेऊन हाती काहीच न लागल्याने आता जीएसटीच्या माध्यमातून कर लावण्यात येत आहे का? जगभरात अनेक देशांना मंदीचा फटका बसत असताना भारतात यावर कुठलाही परिणाम होणार नाही असे सांगण्यात येत आहे. मग जर अर्थव्यवस्था व्यवस्थित असेल तर टॅक्सेस लावण्याचे कारण तरी काय असा सवालही छगन भुजबळ यांनी यावेळी उपस्थित केला.

महाराष्ट्र हे सर्वाधिक जीएसटी देणारे राज्य आहे. त्यात राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे दिल्लीत चांगले वजन आहे. त्यामुळे त्यांनी आपले वजन वापरून महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दिल्ली दरबारी कळवून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणीही छगन भुजबळ यांनी केली.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT