मुंबई : मुंबई आणि ठाणे परिसरात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे सखल भागात पाणी साचले आहे. (Mumbai Rains) रात्रभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नवी मुंबईतील अनेक भाग जलमय झाले आहेत. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईत शुक्रवार आणि शनिवारी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर ठाण्याला यलो अलर्ट दिला आहे.
मुंबईत मान्सूनचा पाऊस तीव्र स्वरुपाचा असून चक्रीवादळही तयार झाले आहे. त्यामुळे पश्चिमेकडून जोरदार वारे वाहू लागले आहेत, असे हवामान विभागाने म्हटले आहे. अत्यंत खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर ऑरेंज अलर्ट जारी केला जातो. त्याचा रेल्वे, रस्ते, हवाई यासह वाहतूक सेवांवर परिणाम होतो.
पालघर भागातही आज सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे. हवामान विभागाने पालघरसाठीही ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील तीन ते चार तासांत मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असे हवामान विभागाने नमूद आहे. "पुढील ३ ते ४ तासांत मुंबई जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे, असे IMD ने म्हटले आहे. तसेच ठाणे आणि रायगडमध्येही यलो अलर्ट जारी केला आहे.
मुंबई शहर व उपनगरात बुधवारी विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. मध्यरात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी तुंबले होते. त्यामुळे बेस्ट बससह अन्य वाहने पर्यायी मागनि वळवण्यात आली. रेल्वे ट्रॅकवर कुठेही पाणी तुंबले नसले तरी, पश्चिम व मध्य रेल्वे मार्गावरील लोकल पाच ते दहा मिनिटे विलंबाने धावत होत्या. सोमवारी मुंबईकरांना झोडपून काढणाऱ्या पावसाने मंगळवार व बुधवारी विश्रांती घेतली होती. मात्र बुधवारी मध्यरात्रीपासून पुन्हा पाऊस संपूर्ण शहरात सक्रिय झाला. गुरुवारी सकाळी पावसाचा जोर होता. त्यामुळे संगम नगर, अंधेरी, मालाड, आदी भागात पाणी तुंबले होते. त्यामुळे या भागातील वाहतूक १५ ते २० मिनिटांसाठी पर्यायी मागनि वळविण्यात आली.
दुपारनंतर मात्र पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरला. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ठाणे मार्गावरील लोकल सेवा पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट विरार मार्गावरील लोकल ५ ते १० मिनिटे विलंबाने धावत होत्या. पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गाचे एलबीएस मार्ग, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड या प्रमुख रस्त्याची दक्षिण मुंबईत वाहतूक कोंडी झाली होती.
दिवसभरात सुमारे १५ ठिकाणी झाडे व झाडाच्या फांद्या पडल्या तर सहा ठिकाणी किरकोळ शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. पूर्व व पश्चिम उपनगरात दोन ठिकाणी घरांची पडझड झाली. मात्र यात कोणालाही मार लागला नाही. दरम्यान येथे २४ तासात शहर व उपनगरात मध्यम व जोरदार तर काही ठिकाणी अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे.