मुंबई : सरोगेट माता पुरविण्याचा एक धक्कादायक प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन महिलांना सहार पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्या दोघीही बँकॉकहून आल्या होत्या. याप्रकरणी या दोन महिलासह तिघांविरुद्ध सहार पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
अटक आरोपीपैकी एक महिला आयव्हीएफ क्षेत्रात एजंट म्हणून काम करत असून तिने दुसऱ्या महिलेला सरोगसीसह एग डोनर्ससाठी प्रवृत्त केल्याचे निष्पन्न झाले आहे. शुक्रवारी दुपारी बँकॉकहून आलेल्या सुनोती आणि विंझारत नावाच्या दोन महिलांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते.
बँकॉकला जाण्यामागील कारणाबाबत विचारणा केल्यानंतर त्यांना काहीच उत्तर देता आले नाही. त्यामुळे त्यांची या अधिकाऱ्यांनी चौकशी सुरु केली होती. त्यात सुनोती ही आयव्हीएफ क्षेत्रात एजंट म्हणून काम करत असून तिने संगीता नावाच्या एका महिलेच्या मदतीने ठाण्यात एजन्सी सुरु केली होती. या एजन्सीच्या माध्यमातून त्या दोघीही देश-विदेशात विविध प्रजनन केंद्रांना एग डोनर्स आणि सरोगेट माता पुरविण्याचे काम करत होत्या. त्यांच्यासाठी विंझारत ही काम करत होती. त्यासाठी तिला मोठे कमिशन दिले जात होते.
एग डोनर्ससह सरोगेटसाठी विवाहीत असणे गरजेचे होते, मात्र त्यांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे विंझारतला या कामासाठी तयार केले होते. विंझारतच्या चौकशीत तिने या दोघींच्या सांगण्यावरुन 2023 साली अंधेरीतील एका खासगी रुग्णालयात स्वतःच्या गर्भातील अंडी-जनुक विक्री केली होती. 2024 साली ती सुनोती आणि संगीताच्या सांगण्यावरुन केनिया, कझाकिस्तान, थायलंड येथे गेली होती, मात्र वैद्यकीय कारणामुळे तिला तिचे जनुक विक्री करता आले नव्हते.
काही दिवसांपूर्वी सुनोती ही विंझारतला बँकॉकला एग डोनेशन टेस्टसाठी घेऊन गेली होती. यापूर्वीही त्या दोघीही अनेकदा बँकाँकला गेल्या होत्या. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या दोन्ही महिलांना चौकशीसाठी सहार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. याप्रकरणी इमिग्रेशन अधिकाऱ्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिन्ही महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याच गुन्ह्यात सुनोती आणि विंझारतची चौकशी सुरु आहे.
व्यावसायिक सरोगसीद्वारे ही टोळी मोठी रक्कम वसुल करत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याकामी त्यांना अन्य कोणी मदत केली, बोगस दस्तावेज कोणी बनविले. भारतासह विदेशात त्यांनी एग डोनर्ससह सरोगसीसाठी विंझारतला पाठविले होते. त्याची माहिती काढली जात आहे.