illegal mining in Palghar Raigad Thane Issue
मुंबई : राज्यात अवैध खाणकामांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असतानाच हा मुद्दा आता विधानसभेतही गाजला. सरकारच्यावतीने याबाबत भूमिका मांडताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी कठोर कारवाईचे संकेत दिले. पालघर, ठाणे आणि रायगड या भागांतील अवैध खाणी बंद करण्याचा घोषणा त्यांनी केली असून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करून तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सोमवारी विधानसभेत ठाकरे गटाचे दिंडोशीतील नेते सुनील प्रभू यांनी ठाणे, रायगड, पालघरमधील अवैध खाणींचा मुद्दा उपस्थित केला. अवैध उत्खननामुळे सरकारचा महसूल मोठ्याप्रमाणात बुडाला असून या अवैध खाणकामांना मदत करणाऱ्या तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी आमदार प्रभू यांनी केली.
यावर उत्तर देताना बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, अवैध खाणकामावर कारवाई होणार असली तरी वैध खाणी मात्र सुरूच राहतील. “बांधकाम क्षेत्रासाठी आवश्यक असलेला साहित्य पुरवठा खंडित होऊ नये, यासाठी वैध खाणींचे कामकाज सुरू ठेवणे गरजेचे आहे,” असे त्यांनी सभागृहात स्पष्ट केले.
राज्यातील खाणकामाच्या स्थितीचा सखोल आढावा घेण्यासाठी सरकारकडून संपूर्ण राज्याचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणासाठी सुमारे तीन महिन्यांचा कालावधी लागेल, अशी माहितीही त्यांनी दिली.
तसेच, रॉयल्टी बुडवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगताना त्यांनी अशा प्रकरणांना सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही वाचवले जाणार नाही, असा इशाराही दिला. गेल्या पाच वर्षांतील सर्व व्यवहारांची चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर पुढील अधिवेशनापर्यंत श्वेतपत्रिका (White Paper) सादर करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे राज्यातील खाणकामातील गैरप्रकार उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.