

उरण : राजकुमार भगत
खारघर येथील टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या मागील बाजूस सुरू असलेल्या कथित बेकायदा दगड खाणकाम आणि क्रशिंग कारवायांची राष्ट्रीय हरित लवादाने गंभीर दखल घेतली आहे. या खाणकामामुळे रुग्णालयाच्या इमारतीला आणि संवेदनशील वैद्यकीय उपकरणांना धोका निर्माण झाला असून, याची चौकशी करण्यासाठी एनजीटीने चार सदस्यीय संयुक्त समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.
नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती दिनेश कुमार सिंह आणि डॉ. सुजित कुमार बाजपेयी यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले. या समितीत प्रदूषण नियंत्रण मंडळ, रायगड जिल्हाधिकारी, भूगर्भ व खनिज विभाग आणि पर्यावरण मंत्रालयाचे प्रतिनिधी असतील. बेकायदा उत्खनन नेमके किती झाले आणि या स्फोटांमुळे रुग्णांच्या आरोग्यावर काय परिणाम झाला, याचा अहवाल समितीला एका महिन्यात सादर करायचा आहे.
रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी 2020-21 नंतर खाणकामास परवानगी नसल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले असले तरी, सहा क्रशर अजूनही सुरू असल्याचे समोर आले आहे. या स्फोटांमुळे आणि धुळीमुळे कर्करोग रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 एप्रिल रोजी होणार असून समितीचा अहवाल निर्णायक ठरणार आहे.