कोपरखैरणे : नवी मुंबईतील महापे येथे बेकायदेशीर कॉल सेंटरवर सायबर पोलिसांनी धाड टाकून त्याला सील ठोकले. याप्रकरणी 17 जणांना अटक करण्यात आले आहे तर 7 पेक्षा अधिक लोकांचा शोध सुरू आहे. तसेच चार जणांना नोटीस बजावण्यात आली आहे. सट्टा बाजारात गुंतवणुकीवर कमी कालावधीत मोठा परतावा मिळेल असे आमिष दाखवून सामान्य जणांची फसवणूक आणि रात्रपाळीत हेल्पलाईनच्या नावाखाली पैसे घेतले जात असल्याचे समोर आले आहे. आरोपींना 23 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
गगन अजितकुमार थापर, रोशन सुदेश घायवट, सत्यम रामशंकर यादव, महेश अभिमन्यू पाटील, संकेत चंद्रकांत सरतापे, हर्षद सणस, विनायक चव्हाण, सुमित फडके, अक्षय शिर्के, अमित शिर्के, पंकज शेंडे , सुमेध कोरडे अतुल ठाकुर , मयुर गायकवाड गणेश डंगापुरे, गणेश पाटोळे,नरेश अहिरवार असे अटक केलेल्यांनी नावे आहेत. तसेच श्रध्दा गजरे, प्राजक्ता गोळे, संतोष धोत्रे यांना नोटीस बजावण्यात आली आहे.शिवाय शिव शर्मा, सचिन लोभे , अजहर जमादार सोनी , हरिष पवार, शॉन, लिजा उर्फ स्नेहल यांचा शोध सुरू आहे.सर्व आरोपी हे 21 ते 49 वयोगटातील असून तरुणांचा भरणा अधिक आहे. यातील गगन थापर, अक्षय शिर्के व शिव शर्मा हे मुख्य आरोपी असून यातील शर्माचा शोध सुरू आहे.
महापे येथील मिलेनियम बिझनेस पार्क येथील इमारत क्रमांक तीन तिसऱ्या माळ्यावर एक कॉल सेंटर सुरू आहे. या कॉल सेंटरला कुठलीही परवानगी नसून बेकायदेशीररित्या चालते. या माहितीची शहानिशा गुप्त पद्धतीने करण्यात आली व योजनाबद्धरित्या मंगळवारी रात्री या कॉल सेंटरवर धाड टाकण्यात आली. त्यावेळी द वेल्थ ग्रोथ, द कॅपिटल सर्व्हिस सिग्मा आणि ट्रेड नॉलेज सर्व्हिस तसेच स्टोक व्हिजन या कंपन्या आढळून आल्या. तिसऱ्या पूर्ण माळ्यात याच कंपन्यांचे कार्यालय होते.
हे कॉल सेंटर 1 जानेवारी 2025 पासून सुरू आहे. तसेच संगणक व अन्य तांत्रिक तपास जो आतापर्यंत करण्यात आला त्यानुसार सामान्य नागरिकांची 12 कोटी 29 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र हा तपास अद्याप पूर्ण झाला नसून त्यात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तपासात एकूण 71 बँक खात्यांतून देवाण घेवाण झाली असून त्यात 61 खात्यांत 12 कोटी 29 लाखांचा व्यवहार झाला आहे. त्याची तपासणी नॅशनल क्राईम रिपोटींग पोर्टलवर केली असता देशभरातून 31 सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी आढळून आल्या.
दोन पाळीत काम
कॉल सेंटरवर दिवस पाळीत लोकांना सट्टा बाजारातील पैशांचे आमिष दाखवून फसवणूक केली जात होती. तर रात्रपाळीत आय टी वर्ड सोल्युशन या कंपनीतर्फे अमेरिकेतील नागरिकांच्या संगणकांमध्ये रँसंमवेअर मालवारे अटॅक केला जातो. त्यामुळे संगणक फिज होवून स्क्रिनवर मायक्रो एरर कोड असा संदेश येतो. त्यांचे कॉल सेंटरचा हेल्प लाईन क्रमांक दिला जातो. त्यावरून कोणी फोन केला कि कॉल सेंटर मधील कर्मचारी ते मायक्रो सॉफ्ट हेल्पलाईन सेंटरमध्ये काम करीत असल्याचे भासवले जाते.