मुंबई: आपला मुलगा साहिच्या मृत्यूप्रकरणी आयआयटीकडून स्वतंत्र चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी चौकशी समितीने आपल्याशी अद्याप संपर्कच साधलेला नाही, असा दावा साहिलचे वडील रवींद्र वाकोडे यांनी केला.
सोमवारपासून पुन्हा आझाद मैदानात उपोषण सुरू करत प्रा. सूर्यनारायण दुल्ला आणि आयआयटीचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांना अटक होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार,’ असा इशारा वाकोडे यांनी दिला.
आझाद मैदानात पत्रकारांशी संवाद साधताना वाकोडे यांनी या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेजबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित केला. तपासाचा भाग असलेले फुटेज बाहेर कसे आले, ते कोणी बाहेर आणले आणि ते जाणीवपूर्वक बाहेर आणले गेले का, याची चौकशी झाली पाहिजे, त्यासाठी अटक आवश्यक आहे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
साहिलने परीक्षेत कॉपी केली किंवा मोबाइलचा वापर केला, या मुद्द्यापुरताच तपास मर्यादित राहू नये, साहिलविरोधात नेमकी काय कारवाई झाली, त्याच्यावर कोणता दबाव निर्माण झाला आणि त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणारी परिस्थिती कशी निर्माण झाली, या सर्व बाबी तपासात येणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
एफआयआरमध्ये अत्याचाराचा गुन्हा आहे त्याचबरोबर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचाही गुन्हा नोंद आहे. त्यामुळे त्याला प्रवृत्त का केले, कसे केले, याचा तपास झाला पाहिजे, असे वाकोडे म्हणाले.
साहिलच्या मृत्यूला दहा दिवस उलटूनही अटकेबाबत निर्णय झालेला नसल्याने वाकोडे यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. सोमवारी सायंकाळी सहा वाजता नियमानुसार उपोषणाची वेळ संपत असली, तरी पुढेही नियमांचे पालन करून उपोषण सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारकडून अद्याप प्रतिनिधी नाही
सरकारच्या कोणत्याही प्रतिनिधीने आझाद मैदानात येऊन आपली भेट घेतलेली नाही, असे वाकोडे यांनी सांगितले. मात्र, अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या प्रतिनिधींनी सहकार्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी नमूद केले.
विविध पक्ष, विद्यार्थी संघटनांचा पाठिंबा
साहिल वाकोडे यांच्या कुटुंबीयांच्या आंदोलनाला सोमवारी दिवसभरात विविध राजकीय नेते, विद्यार्थी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आझाद मैदानात भेट देत पाठिंबा दिला. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड, माजी खासदार हुसेन दलवाई यांनी वाकोडे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली.
तसेच एसएफआय, एआयएसएफ, एआयएसए आणि शेतकरी कामगार पक्षाच्या विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही आझाद मैदानात उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.