मुंबई : आशियाई विद्यापीठांच्या अव्वल 100 संस्थांच्या यादीत भारतातील सात शैक्षणिक संस्थांनी स्थान मिळवले असले तरी गतवर्षीच्या तुलनेत यंदा देशातील प्रमुख संस्थांच्या विशेषतः आयआयटींच्या क्रमवारीमध्ये मोठी घसरण झाली आहे. यंदा आयआयटी दिल्ली आणि मुंबईने पहिल्या 100 संस्थांमध्ये स्थान मिळवले आहे.
लंडनमधील क्वाक्वेरेली सायमंड्सने (क्यूएस) जाहीर केलेल्या आशियाई विद्यापीठांच्या क्रमवारीमध्ये अव्वल 100 संस्थांच्या यादीत सात भारतीय संस्थांनी स्थान मिळवले आहे. यामध्ये आयआयटी दिल्लीने सलग पाचव्या वर्षी भारतातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था म्हणून नावलौकिक कायम ठेवला आहे.
शैक्षणिक प्रतिष्ठा, कर्मचारी प्रतिष्ठा, प्राध्यापक-विद्यार्थी गुणोत्तर, आंतरराष्ट्रीय संशोधन नेटवर्क, प्रबंध, शिक्षकांनी सादर केलेले प्रबंध, पीएचडी असलेले कर्मचारी, आंतरराष्ट्रीय प्राध्यापक, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी यांच्या आधारे क्रमवारी जाहीर करण्यात येते. भारतीय शैक्षणिक संस्थांची घसरण प्रामुख्याने प्रबंध, प्राध्यापक-विद्यार्थी गुणोत्तर, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी गुणोत्तर या निकषांमध्ये झाली आहे.
क्यूएस यादीत आयआयएससी बंगळुरूने 64 वा, आयआयटी मद्रास 70 वा, आयआयटी मुंबई 71 वा, आयआयटी कानपूर आणि आयआयटी खरगपूर 77 वा आणि दिल्ली विद्यापीठ 95 व्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर पहिल्या 200 मध्ये 20 आणि 500 संस्थांमध्ये 66 संस्थाचा समावेश आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा देशातील शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.
आयआयटी दिल्लीने देशात अव्वल राहण्याचा मान कायम ठेवला असला तरी गतवर्षीच्या 44 व्या स्थानावरून यंदा 59 व्या स्थानावर घसरण झाली आहे. त्याचबरोबर आयआयएससी बंगळुरूची 62 व्या स्थानावरून 64 व्या स्थानी, आयआयटी मद्रासची 56 व्या स्थानावरून 70 व्या स्थानी, आयआयटी कानपूर आणि आयआयटी खरगपूर अनुक्रमे 67 व्या आणि 60 व्या स्थानावरून 77 व्या स्थानी आणि दिल्ली विद्यापीठ 81 व्या स्थानावरून 95 व्या स्थानी घसरले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा देशातील 105 संस्थांच्या क्रमवारीत घसरण झाली असून, 16 संस्थांचे स्थान कायम राहिले आहे, तर 36 संस्थांच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत भारतीय शैक्षणिक संस्थांच्या गुणांमध्ये सुधारणा झाली असली तरी आशियातील अन्य संस्थांच्या तुलनेत क्रमवारीत घसरण झाली असल्याचे क्यूएसने जाहीर केलेल्या यादीतून दिसून येत आहे.