आयआयटी मुंबईत आजपासून ‌‘टेकफेस्ट‌’ची धूम 
मुंबई

Mumbai News : आयआयटी मुंबईत आजपासून ‌‘टेकफेस्ट‌’ची धूम

संरक्षण, अवकाश, एआयवर भर; स्वयंचलित तंत्रज्ञानावर आधारित स्पर्धांचे आयोजन

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : देशातील विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठा आणि आशियातील अग्रणी महोत्सव म्हणून ओळखला जाणारा टेकफेस्ट आज (सोमवार) ते बुधवार दरम्यान आयआयटी मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. टेकफेस्टचे यंदाचे हे 29 वे वर्ष असून, संरक्षण, अवकाश विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वयंचलित वाहने आणि रोबोटिक्स या क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

युनेस्को, युनिसेफ, ‌‘मेक इन इंडिया‌’ यांसारख्या संस्थांचे पाठबळ मिळवलेल्या या महोत्सवाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. यंदाच्या टेकफेस्टमध्ये 25 हून अधिक तंत्रज्ञानावर आधारित विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून, 65 लाख रुपयांपेक्षा अधिक बक्षीस रक्कम आहे. यंदा प्रथमच भारताची पहिली स्वयंचलित कार रेसिंग स्पर्धा होणार आहे. यात ‌‘इंटरनॅशनल रोबोरेसर‌’ आयोजित करण्यात येत असून, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऑटोनॉमस मोबिलिटी क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष चाचणी या स्पर्धेत होणार आहे. याशिवाय इंटरनॅशनल ड्रोन रेसिंग लीग आणि इंटरनॅशनल फुल थ्रॉटल या स्पर्धांमध्ये 35 हून अधिक देशांतील आंतरराष्ट्रीय संघ सहभागी होणार आहेत.

महोत्सवातील व्याख्यानमालेत माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, इस्रोचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन, उद्योगपती एन. आर. नारायणमूर्ती, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यांचे व्याख्यान व संवाद सत्र आयोजित करण्यात आले आहेत. याशिवाय डिफेन्स सिम्पोजियममध्ये देशाच्या तिन्ही सैन्यदलांचे माजी प्रमुख एकत्र येणार असून, राष्ट्रीय सुरक्षा, संरक्षण सज्जता आणि स्वदेशी तंत्रज्ञानावर चर्चा होणार आहे. स्पेस सिम्पोजियममध्ये गगनयान मोहिमेतील अंतराळवीर सहभागी होऊन भारताच्या मानव अंतराळ मोहिमेचा अनुभव मांडणार आहेत.

टेकफेस्टमधील प्रदर्शनात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे सादरीकरण होणार आहे. भारतातील पहिले ग्लोबल ह्युमनॉइड कॉन्क्लेव्ह, ब्रेन-कॉम्प्युटर इंटरफेस, एनएसजी कमांडोंचे के-9 ड्रिल तसेच डीआरडीओ विकसित ‌‘आकाश‌’ क्षेपणास्त्र, अर्जुन एम-2 रणगाडा आणि ‌‘झोरावर‌’ उच्च उंचीवरील रणगाडा यांचे प्रदर्शन ठेवण्यात आले आहे. संरक्षण तंत्रज्ञानातील स्वदेशी प्रगती अधोरेखित करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.

इंजिनिअरींग कौशल्य, रणनीती आणि डिझाइनची कसोटी पाहणारी ही स्पर्धा दरवर्षी मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आकर्षित करते. यासोबतच आंतरराष्ट्रीय उद्योग व फिनटेक शिखर परिषद आयोजित करण्यात आली असून, उद्योगजगत, स्टार्टअप्स आणि नवउद्योजकांसाठी हे व्यासपीठ महत्त्वाचे ठरणार आहे. याबरोबरच जावा, पायथन, मशीन लर्निंग, रोबोटिक्स, एथिकल हॅकिंग, वेब डेव्हलपमेंट यांसारख्या विषयांवरील हँड्स-ऑन कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. तीन दिवस चालणाऱ्या टेक्नोहोलिक्स आणि ओझोन या टेक्नो-कल्चरल कार्यक्रमांत आंतरराष्ट्रीय कलाकारांचे सादरीकरण, ईडीएम नाईट्स, लेझर शो, लाईव्ह परफॉर्मन्स आणि आधुनिक प्रकाशयोजनांमुळे आयआयटी मुंबईचा कॅम्पस उत्सवमय होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT