Sahil Wakode Case:  pudhari photo
मुंबई

Sahil Wakode Case: आयआयटीच्या प्रवेशद्वारावरील आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न?

विद्यार्थ्यांचा आरोप; १३व्या दिवशीही ठिय्या⁠

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : आयआयटी मुंबईच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील ‘जस्टिस कॉर्नर’मध्ये ठिय्या देणाऱ्या विद्यार्थ्यांना आंदोलनस्थळावरून सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हटविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. मुख्य प्रवेशद्वार पुन्हा सुरू केल्यानंतर प्रशासनाने आंदोलनस्थळ रिकामे करण्यासाठी हालचाली केल्याचा विद्यार्थ्यांचा दावा आहे.

गेल्या १८ सप्टेंबर रोजी आयआयटी मुंबईतील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी मुख्य प्रवेशद्वाराजवळ आंदोलन सुरू केले आहे. विद्यार्थी शांततेत आंदोलनाला बसले होते. मात्र, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना आंदोलनाच्या कोपऱ्याकडे ढकलल्याचे, तसेच एका विद्यार्थ्याला धमकावल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. आंदोलनामुळे विद्यार्थी, कर्मचारी किंवा वाहनांच्या ये-जा करण्यात कोणताही अडथळा निर्माण होत नसल्याचा दावाही त्यांनी केला.

विद्यार्थ्यांच्या मागण्या अद्याप प्रलंबित असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे. न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला असून, विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी व माजी विद्यार्थ्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही केले.

आयआयटी मुंबईचे संचालक शिरीष केदारे यांच्या राजीनाम्याची आणि प्रा. सूर्यनारायण दुल्ला यांच्या निलंबनाची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. संस्थेने नेमलेल्या चौकशी समितीत अनुसूचित जाती-जमातींच्या प्रतिनिधींचा समावेश करावा, समितीत बाहेरील तज्ज्ञांची नियुक्ती करावी आणि विद्यार्थ्याच्या मृत्यूची स्वतंत्र चौकशी करावी, अशीही मागणी आहे.

साहिलच्या कुटुंबीयांच्या भेटीला राजकीय नेते

आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या साहिलच्या आई-वडिलांची बुधवारी माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आमदार अमीन पटेल, जयदीप कवाडे आणि महादेव जानकर यांनी भेट घेतली. या नेत्यांनी साहिलच्या कुटुंबीयांना पाठिंबा दर्शविला. प्रकरणाचा निष्पक्ष, न्याय्य आणि जलद तपास करावा, तसेच तपासात जबाबदार आढळणाऱ्यांविरोधात कायद्यानुसार योग्य कारवाई करावी, अशी मागणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT